Vande Bharat Sleeper Train (संग्रहित संपादित प्रतिमा)

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat Train) प्रवास करणाऱ्या किंवा प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वंदे भारत ट्रेन ही देशात खूप लोकप्रिय झाली आहे. या लक्झरी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. अशा परिस्थितीत आता वंदे भारतच्या काही वेगळ्या आवृत्त्या लाँच करण्याची तयारी सुरू आहे. याअंतर्गत वंदे साधरण ट्रेन आणि वंदे मेट्रो ट्रेन या वर्षी सुरू होणार आहेत. दुसरीकडे, वंदे भारत स्लीपर ट्रेनही (Vande Bharat Sleeper Train) लॉन्च होणार आहे. पुढच्या वर्षी ही स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असेल.

याप्रकरणी इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी सांगितले की, ते या आर्थिक वर्षात वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लाँच करतील. ​​स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. ही गाडी आतून अगदी आलिशान दिसत आहे. या ट्रेनमध्ये 857 बर्थ असतील. प्रत्येक कोचमध्ये चार ऐवजी तीन शौचालये आणि एक मिनी पॅन्ट्री असेल.

मल्ल्या पुढे म्हणाले, या आर्थिक वर्षात ते वंदे मेट्रोही सुरू करणार आहेत. ट्रेन बिगर वातानुकूलित प्रवाशांसाठी सुरू होईल, ज्याला नॉन-एसी पुश-पुल ट्रेन म्हणतात. यामध्ये 22 डबे आणि एक लोकोमोटिव्ह असेल. ही ट्रेन 31 ऑक्टोबरपूर्वी सुरु होणार आहे. वंदे भारतच्या स्लीपर आवृत्तीवर वेगाने काम सुरू आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, त्यापैकी 11 एसी 3 टायर, 4 एसी 2 टायर आणि 1 डबा फर्स्ट एसी असेल. (हेही वाचा: Khadi Mahotsav: जनतेच्या पसंतीला उतरत आहेत 'खादी' ब्रँड्स; 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान खास महोत्सवाचे आयोजन)

या ट्रेनचा सेट पुढील वर्षी मार्चपूर्वी तयार होईल, त्यानंतर पहिली ट्रेन चाचणीसाठी पाठवली जाईल. चाचणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील आणि नंतर ही ट्रेन लोकांसाठी लाँच केली जाईल. देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन आयसीएफ चेन्नई येथे तयार केली जाणार आहे. स्लीपर वंदे भारत लांब पल्ल्यांवर चालवली जाईल. राजधानीपेक्षा या गाड्या अधिक सोयीच्या असतील.