उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांच्या कार्यक्रमापूर्वी लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri) बनबीरपूरमध्ये मोठा गदारोळ माजला आहे. टिकुनियामध्ये उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे असलेले शेतकरी व भाजप नेत्यांमध्ये झटापट झाली. शेतकरी रस्त्याच्या कडेला उभे राहून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमाला विरोध करत होते. अशात बातमी आहे की, या दरम्यान केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने या शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात किमान तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
संयुक्त किसान मोर्चाने ट्विट करून ही माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याच्या वाहनांने चिरडल्याने 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून 8 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी, लखीमपूर-खेरीमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा कार्यक्रम होता. केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे गाव बनबीरपूरला जायचे होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी एकत्र जमले होते. मात्र, केशव प्रसाद मौर्य यांच्या आगमनापूर्वीच भाजपच्या काही नेत्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चढवली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.
या कृत्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तेथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना आग लावली. हा गोंधळ पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी डीएम आणि एसपी उपस्थित आहेत. लखनौहून आयुक्त आणि आयजी घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. या अपघातात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा भारतीय किसान युनियनने केला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. (हेही वाचा: Chandigarh Cyber Crime Case: नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची 91,000 रुपयांची ऑनलाइन फसवणूक, आरोपी विरोधात गुन्हा दाखल)
दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल म्हटले आहे की, ते शेतकऱ्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'हे अमानुष हत्याकांड पाहूनही जो गप्प आहे, तो आधीच मेला आहे. पण आम्ही हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - किसान सत्याग्रह जिंदाबाद.’