मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील एका काँग्रेस आमदाराच्या मुलावर एका हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर हा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचे समजते. गुन्हा दाखल करण्याची घटना घडल्यानंतर दोनच दिवसात या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. रियाज इकबाल (SP Riyaz Iqbal) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. इकबाल हे मुरैन इथले एसपी होते. गुरुवारी (28 फेब्रुवारी 2019) त्यांची बदली करुन भोपाळ पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले. इकबाल यांनी काँग्रेस आमदार ऐदल सिंह कंसाना (Congress MLA Aidal Aingh Kansana) यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला होता.
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस आमदार ऐदल सिंह कंसाना यांचा मुलगा राहुल सिंह कंसाना आणि त्याच्या साथिदारांविरुद्ध हवेत गोळीबार आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांसोबत मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 23 आणि 24 फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान घडली. ही घटना घडण्यापूर्वी राहुलने मॅनेजरला बोलवले आणि त्याला गाडी थांबविने आणि टोल घेण्याचे परिणाम भोगण्यास सांगण्यात आले. मॅनेजरला धमकावल्यानंतर त्याच्यासह इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचा राहुल याच्यावर आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणात राहुल याला अटक होण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. प्राप्त माहिती अशी की, या अधिकाऱ्याची दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाबाबत विचारले असताना अधिकारी इकबाल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या अधिकाऱ्याने आमदाराच्या मुलावर फोनवरुन धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तसेच, टोल नाक्यावर केलेल्या मारहाण आणि तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले आहे. (हेही वाचा, पत्नीच्या गुप्तांगाला दिले तापलेल्या चाकूचे चटके; अनैतिक संबंधाच्या संशयाने पतीचे क्रूर कृत्य)
दुसऱ्या बाजूला आमदार कंसाना यांनी आपल्या मुलाने टोल बूथ कर्मचाऱ्याला फोन केल्याच्या वृत्ताचा स्वीकार केला आहे. परंतू, जेव्हा गोळीबार झाला तेव्हा आपला मुलगा घटसास्थळी उपस्थित नव्हता असेही कंसाना यांनी म्हटले आहे.