उत्तर प्रदेश: लग्नात बूट लपवल्याने नवरदेव भडकला; नवरीने रागावून परतवून लावली वरात
Relationship (Photo Credits: PixaBay)

उत्तर प्रदेश: 'जुते दे दो पैसे ले लो' हे गाणं आल्यापासून लग्नात नवऱ्या मुलाचे बूट लपवण्याचा ट्रेंड हिट झाला आहे. आता तर अगदी प्रत्येक लग्नात ही पद्धत परंपरेसारखी पाळली जाते. पण अलीकडेच मुझ्झफरनगर (Muzzafarnagar) मध्ये लग्नात बूट लपवल्यावरून एवढा मोठा वाद झाला की चक्क यामुळे लग्नच मोडल्याचं समजतंय. झालं असं की, नवरीकडच्या मंडळींनी गंमतीत मुलाचे बूट लपवले आणि मग परत देण्यासाठी पैसे द्या अशी मागणी केली, पण या मुळे हे नवरदेव इतके चिडले की त्यांनी चक्क मुलीकडच्या मंडळींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अर्थात जेव्हा हा प्रकार मुलीच्या कानावर आला तेव्हा तिला ही आपल्या घरच्या मंडळींचा अपमान सहन न झाल्याने तिने भर मंडपात मुलासोबत लग्न मोडून दारी आलेली वरात परतवून लावली.

प्राप्त माहितीनुसार, मुझ्झफरनगर येथील भोराकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हा प्रकार घडताच मुलीने नवऱ्या मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. इतकेच नव्हे तर,हुंडा म्हणून दिलेले दहा लाख रुपये परत करण्याचे मान्य केल्यानंतरच नवरदेवासह वरातीत सहभागी झालेल्या लोकांना दिल्लीला परत जाऊ दिले. नवऱ्या मुलीने दाखवलेल्या हिंमतीचे पोलिसांनी कौतुक केले आहे.

(प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे)

वास्तविक मुलीने घेतलेली भूमिका जरी योग्य असली तरी, वधूपक्षाच्या नातेवाइकांनी या घटनेनंतर नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्याने तेव्हा सुद्धा त्यांना अपशब्द सुनावले. एका नातेवाईकाच्या तर कानशिलातही लगावली. यातून वाद वाढत गेला आणि अखेरीस मुलीनेच लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. अगदी एखाद्या सिनेमात शोभावा असा हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर जोपर्यंत मुलांच्या घरच्यांनी हुंड्यात घेतलेले पैसे पार्ट करण्याचे काबुल केले नाही तोपर्यंत मुलीने त्यांना एका खोलीत बंद करून ठेवले असल्याचे देखील समजत आहे.