उत्तर प्रदेश मध्ये महिन्याभरात थंडीने घेतले 100 बळी
Image For Representations (Photo Credits - PTI)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) थंडीचा कहर काही केल्या आटोक्यात येत नाहीये, तापमानाच्या या निच्चांकी पाऱ्यामुळे नवर्षातील दुसऱ्याच दिवशी आणखी 41 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यापूर्वी थंडीचा प्रभाव जाणवू लागताच उत्तर प्रदेशाला निच्चांकी तापमानाचा फटका बसला होता. 30 डिसेंबर पर्यंत याच भागात तब्बल 68 जणांचा मृत्यू झाला होता ज्यात आता या 41 जणांची भर पडून हा मृतांचा आकडा 100 पार गेला आहे.  Cold In India: उत्तर भारतात थंडीचा कहर, दिल्ली येथे 119 वर्षांचा विक्रम मोडत पारा आणखी खाली घसरला

उत्तर भारतातील अनेक भागात प्रचंड थंडी पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडी व धुक्यामुळे रेल्वे तसेच विमान उड्डाणांना फटका बसला आहे. शहरात देखील धुक्याची चादर पसरून धुरकट दृश्य आहेत. अशातच काल संध्याकाळी, कानपूर, उन्नाव व जालौन मध्ये अवकाळी पाऊस पडला. परिणामी हवामान अधिकच बिघडत गेले. थंडीमुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कुठे हृदयविकार तर कुठे श्वसनाच्या त्रासातून अनेकांवर भीषण परिस्थिती ओढवली आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये याचा मोठा प्रभाव दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी राज्यातील अनेक भागात हवामान बदलल्याचे दिसले. काही ठिकाणी पारा खाली येऊन हुडहुडी आणखीन वाढली तर काही ठिकाणी दिलासा देणारे वातावरण होते. पंजाब मधील अनेक भागात आजची सकाळ ही धुक्याच्या लाटेने झाली तर चंदीगढ, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा येथे देखील नेहमीपेक्षा अधिक थंड वातावरण पाहायला मिळाले.

उत्तर भारतातील राज्यांच्या प्रमाणेच महाराष्ट्रातील नागपूरसह विदर्भामध्ये थंडीची लहर कायम आहे. चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वात निच्चांकी तापामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूरामध्ये सर्वात कमी म्हणजे 5.1 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.