Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) वाराणसीतून (Varanasi) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदारवा परिसरात दोन मुलींनी आपल्या आईचा मृतदेह वर्षभर जगापासून लपवून ठेवला होता. मदारवा येथील रहिवासी उषा त्रिपाठी यांचे 8 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले, त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो तसाच खोलीत लपवून ठेवला. म्हणजेच या मुली गेले एक वर्षे त्यांच्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या.

जेव्हा मृत महिलेच्या एका नातेवाईकाने घरी पोहोचून चौकशी केली, तेव्हा उषा त्रिपाठी यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाल्याचे गुपित उघड झाले. ही बातमी ऐकून आजूबाजूचे लोकही चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पूर्ण कुजलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय उषा त्रिपाठी यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. मूळच्या बलिया येथील उषा त्रिपाठी यांना दोन मुली होत्या. बुधवारी सकाळी शेजारच्या काही लोकांनी उषा त्रिपाठी यांचे मिर्झापूर येथील मेहुणे धर्मेंद्र त्रिपाठी यांना फोन केला आणि उषा त्रिपाठी यांच्या दोन्ही मुली गेल्या एक आठवड्यापासून दिसत नसल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर धर्मेंद्र त्रिपाठी मिर्झापूरहून बनारसला आले. त्यानंतर त्यांना घरात जे दृश्य दिसले ते पाहून त्यांना धक्काच बसला.

उषा त्रिपाठी यांच्या दोन्ही मुलींनी घराच्या आतील खोलीत चादर आणि ब्लँकेटमध्ये मृतदेहाचा सांगाडा गुंडाळून ठेवला होता. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलींची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांची आई उषा त्रिपाठी यांचा मृत्यू 8 डिसेंबर 2022 रोजी झाला होता. साधनांच्या कमतरतेमुळे त्यांनी अंत्यसंस्कार केले नाहीत. (हेही वाचा: Bihar Shocker: शेतातील फ्लॉवर चोरल्याचा संशय, एकाची हत्या; आरोपी फरार)

दोन्ही मुलींकडे एक वर्षाच्या खर्चाबाबत विशारणा केली असता, घरातील वस्तू आणि दागिने विकून घराचा खर्च भागवत असल्याचे त्यांनी सांगितले. कधी कधी त्या शेजाऱ्यांकडूनही उधार घ्यायच्या. शेजाऱ्यांनी सांगितले की उषा त्रिपाठी यांची मोठी मुलगी पल्लवी ही पदवीधर असून तिचे वय अंदाजे 27 वर्षे आहे, तर दुसरी मुलगी ही 17 वर्षांची असून ती 10वीची विद्यार्थिनी आहे. चौकशीअंती समजले की, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींची मानसिक स्थिती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी आईचा मृतदेह इतके दिवस लपवून ठेवला होता.