जमिनीच्या लालसेपोटी तीन भावांनी आपल्या आई आणि बहिणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh0 समोर आली आहे. बस्ती येथील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेठा गावात आई आणि मुलीचे जळालेले मृतदेह त्यांच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आले. गोदावरी (55), पत्नी अवधेश उपाध्याय आणि त्यांची मुलगी सौम्या (25) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. ज्या जमिनीवरून हा सगळा गदारोळ सुरू होता, त्याची अंतिम सुनावणी बुधवारी होणार होती, त्यात मयत आईची साक्ष होती. मात्र जमीन जाऊ नये म्हणून या मुलांनी इतके भयंकर कारस्थान रचले की कोणी कल्पनाही करू शकत नाही.
कलियुगी भावांनी जमीन मिळण्यात अडथळे निर्माण करणाऱ्या आई व बहिणीला आग लावून जाळून टाकले व नंतर घर बंद करून तिथून पळ काढला. या घटनेने संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांची मने हादरली आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मृत आई आणि मुलीने यापूर्वीही हत्येची भीती व्यक्त केली होती. गोदावरी देवी आणि तिची मुलगी सौम्या यांचे जळालेले मृतदेह गावकऱ्यांनी त्यांच्याच घरात पाहिल्यावर त्यांनी कप्तानगंज पोलीस ठाण्यात माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर क्षेत्र अधिकारी कलवारी, कप्तानगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी, गुन्हे शाखेची टीम, फॉरेन्सिक टीम आणि बस्तीचे पोलीस अधीक्षक गोपाल कृष्ण चौधरी यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचायतनामा भरून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. माहितीनुसार, मृत गोदावरी देवी यांचे पती अवधेश उपाध्याय यांचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांनी आपल्या जमिनीची वाटणी आपली दुसरी पत्नी, मुलगी आणि तीन मुलांमध्ये केली होती. या जमीन वाटपाबद्दल मुलांना समजल्यावर ही बाब वादाचे केंद्र बनली. मुलांना आई व बहिणीला जमीन द्यायची नव्हती. (हेही वाचा: Meerut Shocker: मेरठच्या प्रसिद्ध रुग्णालयात लिफ्ट कोसळली; महिला रुग्णाचा वेदनादायक मृत्यू, अन्य तीन जखमी, तपास सुरु)
मयत गोदावरी यांची दुसरी मुलगी सरिता हिने आरोप केला आहे की, वडिलांच्या मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रावरून घरात वाद होत होते. याच कारणांमुळे आपल्या भावांनी आपली आई व बहिणीला घरात जाळून मारले. याबाबत सरिता व तिच्या पतीने पोलिसात फिर्याद दिली. पोलीस अधीक्षक गोपाल कृष्ण चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून काही लोकांवर घर जाळल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेसाठी एसओजी निगराणी आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे पथके तैनात करण्यात आली आहेत.