
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका मुलीची हत्या करून तिचे काळीज बाहेर काढून खाणाऱ्या जोडप्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत दाम्पत्याला सहकार्य करणाऱ्या दोन आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साधारण तीन वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर 2020 रोजी, कानपूरच्या घाटमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भद्रस गावात ही धक्कादायक घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते.
ते दिवाळीचे दिवस होते व त्यावेळी ही निष्पाप पिडीत मुलगी गावातील दुकानात फटाके खरेदी करण्यासाठी गेली होती. तेथून ती बेपत्ता झाली होती आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह शेतात विकृत अवस्थेत आढळून आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी गावातील अंकुल कुरील आणि वीरन कुरील या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जे काही समोर आले त्यामुळे खळबळ उडाली.
मुलीचे काका परशुराम आणि त्याच्या पत्नीने मुलाच्या हव्यासापायी तांत्रिकांच्या सांगण्यावरून, अंकुल आणि वीरन यांना पैसे देऊन मुलीची हत्या करवली होती. इतकेच नाही तर त्यांनी मुलीचे काळीज खाल्ले होते, कारण तांत्रिकाने त्यांना सांगितले होते की, जर त्यांनी मुलीचे काळजी खाल्ले तर त्यांना मूल होईल. महत्वाचे म्हणजे हत्येपूर्वी अंकुल आणि वीरन यांनी दारू पिऊन निष्पाप चिमुरडीवर बलात्कार केला. यानंतर तिचे काळीज काढून परशुरामला देण्यात आले. (हेही वाचा: Thane Shocker: मुरबाड येथे क्रूरतेचा कळस! माजी सभापतीने तलवारीने तरुणाचे दोन्ही हात कापले, गुन्हा दाखल)
मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या कानपूर देहात येथील न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. तीन वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर शनिवारी न्यायालयाने आरोपी दाम्पत्य परशुराम आणि सुनैना यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच अंकुल आणि त्याचा साथीदार वीरेन यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 45 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.