Police | (Photo credit: archived, edited, representative image)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कोखराज (Kokhraj) येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर खचून गेलेल्या मुलीने पठरीवरुन धावणाऱ्या मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. डीके मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. तो कोखराज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भारवारी नगरपरिषदेतील रामबली शर्मा सरस्वती बाल मंदिर शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतो.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

कोखराज ग्रामस्थांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्याध्यापक डीके मिश्रा हा गावातीलच रहिवासी असलेल्या एका मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चारच दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे मीश्रा याच्याकडून मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. व्हिडिओबाबतची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (हेही वाचा, MP Shocker: शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून 7 आदिवासी विद्यार्थिनींवर बलात्कार; व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून मुलींना फसवले)

मुख्याध्यापकाविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मिश्रा याच्यावर आयपीसीच्या कलम 376 (बलात्काराची शिक्षा), 323 (स्वैच्छिकपणे दुखापत झाल्याची शिक्षा), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकावण्याची शिक्षा) अंतर्गत आरोप आहेत. त्याच्यावर IT कायदा आणि POCSO कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्कल ऑफिसर सिरथू, अवधेश कुमार विश्वकर्मा यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी एक टीम तयार केली आहे. (हेही वाचा, Madhya Pradesh Shocker: प्रेयसीचे दुसरीकडे लग्न जमल्याने संतापलेल्या प्रियकराने अपहरण करून केला बलात्कार; गुन्हा दाखल)

पीडितेकडून आत्महत्येचा प्रयत्न

विश्वकर्मा यांनी सांगितले की, मुलीने शनिवारी दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर मालवाहू ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत ती जबर जखमी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आक्षेपार्ह प्रकार व्हायरल झाल्याने मुलगी व्यथित होती.

दरम्यान, आपल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयारल झाल्याचे पाहून कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला होता. आपल्यासोबत घडलेल्या घटनेमुळे आगोदरच व्यथीत असलेली मुलगी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकच खचून गेली. अत्यंत नैराश्येतून तिने धावत्या मालगाडीखाली उडी घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती जीवंत राहीली असली तरी गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, तिची प्रकृती गंभीर जखमी आहे.