Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूरच्या न्यू आझाद नगर येथील प्रयाग विद्या मंदिर इंटर कॉलेजमध्ये सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्या मित्राने वर्गातच चाकूने भोसकून हत्या केली. मृत युवक शनिवारी एका तरुणीसोबत बोलत होता, यावरूनच दोन्ही वर्गमित्रांमध्ये भांडण झाले. त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृत नीलेंद्र तिवारीचे वय 15 वर्षे असून आरोपीचे वय 13 वर्षे आहे.

माहितीनुसार, आरोपी आणि नीलेंद्रची चांगली मैत्री होती. अलीकडे नीलेंद्रने एका मुलीशी बोलायला सुरुवात केली होती. आरोपीला हे आवडले नाही. यामुळे आरोपी नीलेंद्रवर रागावला होता. शनिवारी निलेन्द्र व आरोपींमध्ये भांडण झाले, परंतु त्यावेळी मित्रांनी त्यांचे भांडण शांत केले. त्यानंतर सोमवारी पुन्हा वर्गात त्यांच्यात भांडण झाले. आरोपीने सोमवारी पिशवीत चाकू आणला होता. भांडणानंतर त्याने नीलेंद्रच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने अनेक वार केले. त्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला.

शाळेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा नीलेंद्र तिवारी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला घाईघाईत प्रथम बिधानू येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला हलत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलीस शाळेत पोहोचले आणि आरोपी विद्यार्थ्याची चौकशी सुरू केली.

नीलेंद्रने आरोपीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. यामुळे आरोपी चांगलाच घाबरला होता. त्यानंतर आरोपीने नीलेंद्रलाच मारण्याचा कट रचला. यासाठी तो घरातून चाकू घेऊन शाळेत पोहोचला होता. दुपारच्या जेवणादरम्यान त्याने नीलेंद्रला पकडून जमिनीवर पाडले व त्यच्यावर वार करायला सुरुवात केली. निलेन्द्रच्या मानेवर इतके वार झाले की त्याचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा: राजस्थानमध्ये अल्पवयीन बहिणींवर सामुहिक बलात्कार; दोघी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल)

निलेन्द्रचे वडील जितेंद्र तिवारी एका खासगी कंपनीत काम करतात. नीलेंद्र त्यांचा एकुलता एक मुलगा होता. घरी पत्नी निधी आणि मुलगी राधिका आहे. मुलगीही भावाच्या शाळेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या सहकाऱ्यांसोबत दररोज भांडण करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या आधार कार्डवर जन्मतारीख 18 जानेवारी 2010 अशी आहे. त्यानुसार त्याचे वय अवघे 13 वर्षे आहे. वयाच्या 13 व्या वर्षी तो 10वीत कसा आला हा प्रश्नही उपस्थित होत आहे.