मेरठ: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली सावत्र आईची हत्या
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

सध्या लहान मुले ही त्यांना स्मार्टफोन हवा म्हणून आपल्या पालकांकडे हट्ट करतात. परंतु जर पालकांनी त्यासाठी नकार दिल्यास त्यांना राग येतोच. पण अशा काही घटना घडल्या आहेत ज्या मध्ये मुलांना स्मार्टफोन न दिल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. याच पार्श्वभुमीवर आता युपी मधील मेरठ येथील सरधाना परिसरात मोबाईल खरेदीसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  मुलाने आपल्या सावत्र आईचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलाने हे कृत्य केल्यानंतर स्वत:हून पोलिसांना शरण गेला आहे. मुलाच्या वडीलांनी त्याच्या विरोधात पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

इबादुर्रहमान या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी रेशमा नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले.  या व्यक्तीच्या मुलाला नशा करण्याची सवय असल्याचे सांगण्यात आले आहे. मुलाची ही सवय सोडवण्यासाठी इबादुर्रहमान याने त्याला नशा मुक्ती केंद्रात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच  मुलगा या नशा मुक्ती केंद्रातून घरी परतला होता. त्यावेळी मुलाने रेशमा हिच्याकडे मोबाईल घेण्यासाठी 10 हजार रुपये मागितले. तेव्हाच या दोघांमध्ये जोरदार वाद होत प्रकरण टोकाला गेले.(Kerala: धक्कादायक! केरळमधील मलप्पुरम भागातील 17 वर्षीय मुलीचा 38 जणांकडून लैंगिक अत्याचार; 20 जणांना अटक)

पोलिसांनी या बद्दल अधिक माहिती देत असे म्हटले आहे की,  मुलाने रेशमा हिच्याकडे 10 हजार रुपये मोबाईल खरेदीसाठी मागितले आणि  त्यासाठी हट्ट सुद्धा करु लागला. परंतु रेशमा हिने मुलाला पैसे देण्यार नकार दिला. तेव्हाच या दोघांमध्ये वाद होत रेशमा हिने मुलाला कानाखाली मारले. हा प्रकार घडल्यानंतर संतप्त झालेल्या मुलाने आपल्या सावत्र आईचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.  या प्रकरणी मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.