
उन्नावमधील (Unnao) मौरांवा पोलिस स्टेशन परिसरातील भवानीगंज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी 'छपाक' चित्रपट प्रदर्शित झाला, त्यामध्ये अॅसिड पिडीतेची कथा दाखवण्यात आली आहे. सर्वत्र याबाबत चर्चा सुरु असताना आता, दूध डेअरीची साफसफाई करीत असलेल्या एका युवकाने, मंगळवारी पहाटे एका युवतीने त्याच्यावर अॅसिड फेकल्याचा (Acid Attack) आरोप केला. पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे.
112 वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर, कुटूंबाच्या मदतीने या युवकाला लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुण आणि या मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते, दोघांची ओळख होती तसेच दोघेही एकमेकांशी वरचेवर संवाद साधत होते. हा 25 वर्षीय युवक भवानीगंज येथे दूध डेअरी चालवित आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास तो टँकरमध्ये दूध पाठवून दुग्धशाळेमध्ये साफसफाई करीत होता. त्याचवेळी युवतीने डेअरीमध्ये येऊन याच्यावर अॅसिड फेकले. अॅसिड हल्ल्यामुळे तरुणाची मान, कान, छाती आणि पाठ भाजली आहे. (हेही वाचा: कंगना रनौत च्या जवळच्या व्यक्तीवर झाला होता अॅसिड हल्ला; ट्विटच्या माध्यमातून 'छपाक' टीमचे मानले विशेष आभार)
पोलिसांनी मुलगी, तिची आई आणि वडिलांना ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी विचारपूस केली असता, या तरुणीचे म्हणणे आहे की, ती गेल्या पाच महिन्यांपासून या युवकावर प्रेम करीत होती. तिने या युवकाचा पाठलाग करणेही सुरु केले. बर्याच वेळा ती डेअरीसमोर कायम घुटमळत रहायची. डेअरीमध्ये जाऊन तिने आपले प्रेम व्यक्तही केले होते. मात्र या युवकाने नेहमीच तिला नकार दिला तसेच आपल्याला भेटू नको असेही सांगतले. यावर रागाच्या भरात तिने युवकावर अॅसिड फेकण्याचा निर्णय घेतला.