मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर त्याठिकाणी तात्पुरती नवीन कंटेनर शाखा उभारली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर माघारी परतले. याच शिवसेना शाखा तोडण्यावरून पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. (हेही वाचा - Mumbai Local Megablock: उद्या मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक)
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या खोके सरकारने आमची शाखा पाडून तिकडे एक खोका (कंटेनर शाखा) अडवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. हे नेभळट असून चोर आणि गद्दार आहेत. हे नामर्द पण आहेत. अशी नामुष्की महाराष्ट्राला याआधी कधी आली नाही', असे ठाकरे म्हणाले. 'आज पोलिसांची हतबलता दिसली. या सत्ताधाऱ्यांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज करायला लावला. वारकऱ्यांवरही लाठीचार्ज करायला लावला. असे देखील ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर या ठिकाणी शाखेची नव्याने उभारणी केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.