राम मंदिर: व्यापार मंडळाचा विश्व हिंदू परिषदेच्या धर्म सभेला विरोध; उद्धव ठाकरेंना दाखवणार काळे झेंडे
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख (Representative Image)

Shiv Sena chief Uddhav Thackeray's Ayodhya tour: राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी 25 नोव्हेंबरला अनेक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत एकत्र येणार आहेत. यात शिवसेनेचाही सक्रीय सहभाग असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येत तणाव वाढत आहे. राम मंदिर: उद्धव ठाकरे अयोध्या दौरा- छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन शिवनेरीची माती अयोध्येला नेणार!

विश्व हिंदू परिषदेने धर्म सभेला पाठिंबा मिळवण्यासाठी अयोध्येत रोड शो केला. मात्र अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्म सभेला विरोध केला आहे. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदूत्ववादी संघटना या अयोध्या आणि फैजाबादमधील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्यापार मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पांडे यांनी सांगितले. अयोध्येत 144 कलम लागू असतानाही विहिपने रोड शो केला. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी यावेळी "राम लल्ला हम आये हैं, मंदिर वही बनायेंगे" अशी घोषणाबाजी केली.

राम मंदिर या संवेदनशील मुद्द्याची गंभीरता लक्षात घेऊन अयोध्येत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएक, पीएसी आणि पोलिस तुकड्या तैनात आहेत. कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 6 डिसेंबर 1992 च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रामजन्मभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.