Accident | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कानपूर (Kanpur ) येथे काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये (Kanpur Accident) किमान 31 जण ठार तर 30 हून अधिक जखमी झाले आहेत. घाटमपूर परिसरात सुमारे 50 भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन तलावात पडल्याने पहिला अपघात झाला. या दुर्घटनेत 26 यात्रेकरूंचा मृत्यू झाला, ज्यात बहुतांश महिला आणि मुले आहेत, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, उन्नावमधील चंद्रिका देवी मंदिरातून ट्रॅक्टर परतत असताना ही दुर्घटना घडली. जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात सरह पोलिस स्टेशनच्या स्टेशन प्रभारीला निष्काळजीपणासाठी निलंबित करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दलाला अपघातस्थळी पोहोचवण्यात उशीर झाल्याबद्दल अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली.

अपघाताची दुसरी घटना ट्रक आणि टेम्पोत झालेल्या धडकेमुळे घडलेल्या अपघाताची आहे. कानपूर शहरात काल रात्री रस्ता अपघातात अहिरवण उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने लोडर टेम्पोला धडक दिल्याने पाच जण ठार तर 10 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून ट्रकचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा, Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 यात्रेकरूंच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि अपघातात एक सदस्य गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. जखमींना प्रत्येकी रुपये 50,000 ची आर्थिक मदत दिली जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि वरिष्ठ मंत्री राकेश सचान आणि अजित पाल यांना मदत आणि बचाव उपायांचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी पाठवले. वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, शेतीच्या कामासाठी आणि मालाची ने-आण करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करावा, यावरही त्यांनी भर दिला.