COVID-19 (Photo Credits: IANS)

जगभरात मृत्यूचे तांडव सुरु केलेल्या कोविड-19 (COVID-19) विषाणूने भारतात देखील थैमान घातले आहे. सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 46,711 वर पोहोचली असून एकूण 1,583 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात 31,967 रुग्ण सध्या उपचार घेत असून 13,160 रुग्ण बरे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यात एक स्थलांतरित रुग्णाचा समावेश आहे. ही संख्या लक्षात घेता भारतात झपाट्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर पोहचली आहे. यापैकी 2645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई व उपनगरात आढळून आले आहेत, एकट्या मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ही 9,310 इतकी मोठी आहे. Coronavirus: दिल्लीतील CISF च्या कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचा पगार पीएम केअर फंडमध्ये जमा

लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी रेड, ऑरेंज आणि ग्रीनझोनुसार काही भागात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol And Diesel Prices) वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.

तसेच जगभरात आतापर्यंत तब्बल 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) मधील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यात मंगळवार सकाळपर्यंत जगभरात 2,51,510 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.