Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमलाही उडवण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल पाठवणार्‍याने 500 कोटी रुपये आणि तुरुंगात असलेल्या डॉन लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेची मागणी केली आहे. एनआयएने पंतप्रधान सुरक्षा आणि इतर राज्यांच्या पोलिसांशी माहिती सामायिक केली आहे.

धमकीचा मेल आल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा उद्घाटन सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. आता हा ईमेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने लिहिले की, 'आम्हाला तुमच्या सरकारकडून आणखी 500 कोटी रुपये आणि लॉरेन्स बिश्नोई हवा आहे, अन्यथा उद्या आम्ही नरेंद्र मोदींसह नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देऊ. तुम्ही स्वतःचे कितीही रक्षण केले तरी तुम्ही आमच्यापासून सुटू शकणार नाही. बोलायचे असेल तर या मेलवरच बोला.’

माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना धमकीच्या ईमेलबाबत अलर्ट केले आहे. गुजरात पोलिसांव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांना ही माहिती शेअर करण्यात आली आहे. हा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनीही सुरक्षा वाढवली आहे. मुंबई शहरातील वानखेडे स्टेडियम पाच विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या यजमानपदासाठी सज्ज आहे. (हेही वाचा: PIB Fact Check: सरकारी नोकरीच्या खोट्या जाहिरातीपासून व्हा सावध; जाणून घ्या व्हायरल झालेल्या रेल्वे नोकरभरतीच्या संदेशाबाबत सत्य)

लॉरेन्स बिश्नोई 2014 पासून तुरुंगात आहे. कारागृहातून तो आपली टोळी चालवत होता. पंजाबमध्ये त्याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी, त्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला तुरुंगातून सोडण्याची धमकी दिली होती आणि दावा केला होता की काळवीट मारण्याच्या घटनेमुळे आपला समुदाय सलमानवर नाराज आहे.