राज्य मूलभूत शिक्षण विभागांतर्गत उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात (KGBV) काम करणार्या शिक्षिकेने एका वर्षात पगाराच्या रूपात सुमारे 1 कोटी रुपये मिळवले आहे. महत्वाचे म्हणजे एकाच वेळी तब्बल 25 शाळांमध्ये एकत्र शिकवून तिने हे इतके पैसे कमावले आहेत. विभागाकडून शिक्षकांचा डेटाबेस तयार करताना ही बाब समोर आली. आता या शिक्षिकेविरूद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही विज्ञान विषयाची शिक्षिका आंबेडकर नगर, बागपत, अलिगड, सहारनपूर आणि प्रयागराज अशा अनेक जिल्ह्यात एकत्र काम करत होती.
मानव सेवा पोर्टलवर शिक्षकांच्या डिजिटल डेटाबेसमध्ये, शिक्षकांचे वैयक्तिक रेकॉर्ड, त्यांची जॉयनिंग तारीख आणि पदोन्नतीची तारीख आवश्यक असते. हे रेकॉर्ड अपलोड झाल्यावर, अनामिका शुक्ला या एकाच व्यक्तीचे वैयक्तिक तपशील 25 शाळांमध्ये सूचीबद्ध असल्याचे आढळले. ही बाबा अतिशय गंभीर असल्याने, आता या शिक्षिकेबाबत तपास सुरु असल्याचे, शालेय शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी सांगितले. सध्या ही शिक्षिका संपर्कात नाही. सर्व शाळांमधील नोंदीनुसार शुक्ला ही एका वर्षापेक्षा जास्त काळ या शाळांमध्ये काम करत होती. (हेही वाचा: छोटा भीमने चुटकीला सोडून राजकुमारी इंदुमतीशी केले लग्न; नाराज चाहत्यांनी ट्विटरवर बनवले भन्नाट Memes)
केजीबीव्ही, जिथे ही महिला पूर्णवेळ नोकरीस होती, ही एक मुलींसाठीची निवासी शाळा आहे, जिथे शिक्षक करारांवर नियुक्त केले जातात व त्यांना जवळपास दरमहा सुमारे 30,000 रुपये दिले जातात. जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये कस्तुरबा गांधी शाळा आहे. अनामिकाने फेब्रुवारी 2020 पर्यंत (13 महिन्यांत) या 25 शाळांकडून पगाराच्या रूपात एक कोटी रुपये घेतले आहेत. मैनपुरीची रहिवासी असलेली अनामिका शुक्ला, फेब्रुवारीपर्यंत रायबरेली येथील केजीबीव्हीमध्ये काम करत होती.