दिल्ली विधानसभा निवडणुक 2020 (Delhi Assembly Elections 2020) मध्ये, भाजपला (BJP) आप पक्षाने (AAP) चांगलीच मात दिली. आपच्या विजयाचा डंका जागतिक स्तरावरही वाजला. आता भाजपच्या कडव्या पराभवाबद्दल अमित शाह (Amit Shah) यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. निवडणुकीच्यावेळी आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या भडकाऊ, चिथवनाऱ्या आणि त्रासदायक विधानांमुळे पक्षाला हार प्राप्त झाली, असे अमित शाह यांचे म्हणणे आहे.
पराभवानंतर गुरुवारी (13 फेब्रुवारी 2020) पहिल्यांदा शहा निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलले. ते म्हणाले, 'आम्ही केवळ जय किंवा पराभवासाठी निवडणूक लढवत नाही. भाजपा आपल्या विचारसरणीचा विस्तार करण्यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे.'
एका वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मुल्यांकन चुकीचे असल्याचेही मान्य केले. 'दिल्लीतील निवडणुका भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण विधानांमुळे, तिरस्कारामुळे खराब झाल्या असाव्यात. 'देश के गद्दारों को गोली मारो' अशी वक्तव्ये करायला नको होती,' दिल्ली विधानसभेत भाजपाने मोठा पराभव स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह यांचे असे विधान समोर येत आहे. मात्र त्यांचे हे वक्तव्य देखील त्यांच्याच पुर्वीच्या वक्तव्यावर लागू होते की नाही, यावर स्पष्टीकरण दिले गेले नाही. एका निवडणूक रॅलीत म्हणाले होते की, 'असे बटन दाबा ज्यामुळे शाहीन बागला करंट बसेल'.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या, तर आम आदमी पक्षाला 62 जागा मिळाल्या आहेत. अमित शाह यांचे हे मत यावेळी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण अमित शाह यांनी निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. त्यांची आपल्या नेत्यांबाबतची ही प्रतिक्रिया देखील खास आहे, कारण निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल भाजप आणि अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे. (हेही वाचा: दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या 63 उमेदवारांचे डिपॉझिट होणार जप्त, जाणून घ्या कारण)
दिल्ली निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने एकही संधी सोडली नव्हती. जातीयवाद पसरवण्यापासून, हिंदू धर्म, राष्ट्रवाद सोबत भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांचा अवलंब केला गेला. निवडणूक प्रचारावेळी अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी द्वेषयुक्त वक्तव्ये केली होती, कदाचित अमित शाह यांचा रोख याच्याकडेच असण्याची शक्यता आहे.