आज संध्याकाळी उघडले जाणार केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिराचे दरवाजे; राज्यसरकारकडून महिलांना सुरक्षा पुरवण्यास नकार
शबरिमाला मंदिर, केरळ (संग्रहित छायाचित्र)

केरळमधील (Kerala) प्रसिद्ध शबरीमाला मंदिराचे (Sabarimala Temple) दरवाजे आज, म्हणजेच शनिवारी भाविकांसाठी उघडले जाणार आहे. आजपासून  म्हणजे 16 नोव्हेंबरपासून पुढील कमीतकमी अडीच महिने भाविक मंदिरात अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेऊन शकतील. आजपासून मंदिरात विशेष पूजेची सुरुवात होईल. महिलांच्या प्रवेशामुळे मंदिराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंदिराच्या आसपास सुमारे 25,000 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोर्टाने 28 सप्टेंबर 2018 चा निर्णय कायम ठेवत मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यास नकार दिला आहे.

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भातील खटल्याची सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण एका खंडपीठाकडे सोपवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर 2018 रोजी बहुमताने निकाल दिला होता, ज्याद्वारे अयप्पा मंदिरात 10 ते 50 वयोगटातील मुली आणि महिलांच्या प्रवेशावरील बंदी मागे घेतली गेली. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने शतकानुशतकांच्या या धार्मिक प्रथेला बेकायदेशीर आणि घटनाबाह्य म्हणून संबोधले होते. (हेही वाचा: नारीशक्तीचा विजय! शबरीमाला मंदिराचे दरवाचे महिलांसाठी खुले; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)

दरम्यान  मंदिर उघडण्यापूर्वी काही महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश आणि पूजा करणार असल्याची धमकी दिली आहे. राज्य सरकार अशा महिलांना कोणतीही सुरक्षा पुरवणार नाही. शबरीमाला कर्म समितीने सांगितले आहे की, ज्या महिला मंदिरात प्रवेश करतील त्यांना अडवले जाईल. ज्या महिलांकडे सर्वोच्च न्यायालयाची परवानगी असेल त्यांनाच मंदिरात प्रव्रेश दिला जाईल. आतापर्यंत 45 महिला भाविकांनी मंदिराच्या ऑनलाइन पोर्टलवर दर्शनासाठी अर्ज केला आहे.