आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका चिमुकलीला दोन महिन्यांत सात वेळा विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन महिन्यांच्या बाळाची विक्री केल्याप्रकरणी येथील बाल तस्करी प्रकरणात पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे. सर्वात प्रथम मुलीला तिच्या वडिलांनी 70 हजार रुपयांना विकले होते. बाळाची आई आणि आजीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलागिरी, दाचेपल्ली, हैदराबाद येथील व्यक्तीने बाळाला विकत घेतले होते. बाळाची अखेर विजयवाडा येथून सुटका करण्यात आली.
उत्तर विभागाचे पोलीस उपअधीक्षक, मंगलगिरी पोलीस स्टेशन, जे रामबाबू यांनी ANI ने सांगितले की, त्यांनी या नवजात बाळाची सुटका केली आणि तिला सुरक्षितपणे तिच्या आईच्या स्वाधीन केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी तिचे वडील आहेत, ज्याने बाळाला विकले होते. या मुलीची पुढे अनेकांना विक्री करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडण्यापूर्वी बाळाची शेवटी 2,50,000 रुपयांना विक्री झाली होती.
मनोज हा या मुलीचा बाप व मुख्य आरोपी आहे. त्याला तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. त्याने हे बाळ नलगोंडा जिल्ह्यातील डमराचरला मंडळातील कोंडाप्रोलू गावातील मेघावत गायत्री उर्फ सरस्वती या विवाहित महिलेला 70,000 रुपयांना विकले. नंतर, मेघावत गायत्रीने हे बाळ 1,20,000 रुपयांना हैदराबादच्या दिलशुक नगरच्या एका व्यक्तीला विकले. पुढे या व्यक्तीने बाळाला 1,87,000 रुपयांना नूरजहाँला विकले. नूरजहाँने खम्मम जिल्ह्यातील अनुभोजू उदय किरण या अन्य आरोपीच्या मदतीने हे बाळ पुढे 1 लाख 90 हजारांना विकले. (हेही वाचा: शिक्षणात खंड पडलेल्या 5 लाखांहून अधिक मुलींना शाळांमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार, मंत्री स्मृती इराणींची माहिती)
पुढे या मुलीला विजयवाडा बेंझ सर्कलच्या पाडळा श्रावणीला 2,00,000 रुपयांना विकले. पाडळा श्रावणीने ते बाळ गोल्लापुडी, विजयवाडा येथील गरिकामुक्कू विजयलक्ष्मीला 2,20,000 रुपयांना विकले, ज्याने शेवटी ते बाळ पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एलुरू येथील वररे रमेश यांना 2,50,000 रुपयांना विकले. डीएसपी रामबाबू यांनी सांगितले की, गुंटूर जिल्ह्याचे शहरी पोलिस अधीक्षक आरिफ हाफीज, यांच्या निर्देशानुसार पोलिसांच्या पथकाने गुन्हेगारांना पकडले आणि बाळाची सुटका केली.