Sabarmati Riverfront ते Statue of Unity दरम्यान चालणार देशातील पहिले Seaplane; 31 ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा
Seaplane (Photo Credits: Pixabay)

31 ऑक्टोबर पासून साबरमती रिव्हरफ्रंट (Sabarmati Riverfront) ते स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity) दरम्यान भारताची पहिली सी-प्लेन (Seaplane) सेवा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासाठी एव्हिएशन सर्व्हिस प्रोव्हाईडर स्पाइसजेट मालदीव येथून एक समुद्री विमान खरेदी करीत आहे, जे 26 ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. हे सीप्लेन सुमारे 250 किमी मार्गावर उपयोगी ठरेल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा साबरमती रिव्हर फ्रंटहून अहमदाबादला सीप्लेनने उड्डाण केले होते. ही देशासाठी नवी सुरुवात असेल व यासाठी दोन्ही बाजूला मुलभूत गोष्टी सज्ज आहेत.

मांडवीय म्हणाले, ‘स्पाइसजेट मालदीववरून समुद्री विमान खरेदी करण्याच्या विचारात आहे, जे 26 ऑक्टोबरला येईल. सरकारच्या या उड्डाण योजनेंतर्गत स्पाइसजेटलाही लाभ देण्यात येईल. तसेच एकदा ही सेवा सुरू झाली की या मोहिमेचा पर्यटनास मोठा फायदा होईल. गुजरात सरकारने यावर्षी जुलै महिन्यात सीप्लेन सेवेसाठी प्रादेशिक संपर्क योजनेचा भाग म्हणून, चार जल वायुयान निर्मितीच्या, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) यांच्याबरोबर त्रिपक्षीय कराराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (हेही वाचा: भारतासाठी दिलासादायक बाब; देशाचा कोरोना व्हायरस Recovery Rate पोहोचला 90 टक्क्यांवर, तर मृत्युदर 1.51 टक्के)

19 आसनी सीप्लेनमध्ये 12 प्रवासी बसतील. दिवसा दोन्ही बाजूने चार उड्डाणे चालविली जातील. याचे प्रवास तिकिटाचे भाडे सुमारे 4000 रुपये असेल. मांडवीय यांनी अलीकडेच भारतातील सीप्लेन प्रकल्पांचा आढावा घेतला. साबरमती आणि सरदार सरोवर - स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्ग देशातील 16 सीप्लेन मार्गांपैकी एक आहेत. साबरमती रिव्हरफ्रंट-स्टेट ऑफ लिबर्टी सीप्लेन सर्व्हिस सुरू झाल्यानंतर, इतर अनेक मार्गांवरही ही सेवा सुरू करण्याची योजना आहे, असे मांडवीय म्हणाले. यामध्ये अंदमान निकोबार, गुवाहाटी, यमुना आणि उत्तराखंडमधील टुपर धरणाचा समावेश आहे.