Coronavirus in India: भारतासाठी दिलासादायक बाब; देशाचा कोरोना व्हायरस Recovery Rate पोहोचला 90 टक्क्यांवर, तर मृत्युदर 1.51 टक्के
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

भारतामधील कोरोना व्हायरस (Coronavirus) परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत असलेली दिसून येत आहे. भारतमध्ये कोरोना विषाणू रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) तब्बल 90 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासह देशातील सक्रीय रुग्णांची संख्यादेखील घटत चालली आहे. देशातील दैनंदिन केसेसची संख्याही 50 हजारांवर आली आहे. यामध्ये अजून एक दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मृत्यूदर कमी होऊन 1.51 टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 50,129 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 578 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाच्या एकूण आकडेवारीबाबत बोलायचे झाले तर, आतापर्यंत 78 लाख 64 हजार 811 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सक्रिय प्रकरणांच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. भारतात सध्या 6,68,154 सक्रिय प्रकरणे आहेत. सध्या भारतातील 70 लाख 78 हजार 123 लोक कोरोना विषाणूवर मात देऊन बरे झाले आहेत यासह देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1,18,534 लोक मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 62,077 लोक बरे झाले आहेत. यासह, रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर पोहोचला. सध्या देशाचा सक्रीय रुग्ण दर 8.50% आहे.

देशात आतापर्यंत 10 कोटीहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत देशात 10,25,23,469 नमुन्यांची कोरोना चाचणी झाली. यातील 11,40,905 नमुने काल तपासण्यात आले. देशात बरे झालेल्या लोकांची संख्या संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांपेक्षा 10 पट जास्त आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणू, मृत्यू दर आणि रिकव्हरी रेट जास्त आहे.

दरम्यान, एकेकाळी दिवसाला 15 हजाराच्यावर रुग्ण आढळणाऱ्या महाराष्ट्रामध्ये काल 6417 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 10004 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 14,55,107 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,40,194 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.78% झाले आहे.