Shocking! आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये आढळला बेपत्ता झालेल्या युवतीचा मृतदेह; तपास सुरु
Asaram Bapu (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा-बहराइच रस्त्यावरील विमौर गावातील संत आसाराम बापू (Asaram Bapu) आश्रम परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये एका युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. 5 एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा ही मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आता आश्रमात उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी आल्यानंतर पहारेकऱ्याला कारमध्ये मृतदेह आढळला, त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुलीच्या मृतदेहाची माहिती मिळताच डीएम डॉ उज्ज्वल कुमार आणि एसपी संतोष कुमार मिश्रा यांनी तपासणी केली.

यासोबतच घटनेची खोलवर चौकशी करून आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहचून तपास केला. दुसरीकडे आश्रमाच्या सेवेदारासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसपींनी सांगितले की, शहर कोतवालीमधील एका गावात राहणारी युवती 5 एप्रिल रोजी संध्याकाळी घरातून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी 6 एप्रिल रोजी मिसरौलिया ठाण्यात माहिती दिली. बराच शोध घेऊनही मुलीचा शोध न लागल्याने 7 एप्रिल रोजी तिच्या वडिलांनी तीन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांना गोंडा-बहराइच रस्त्यावरील संत आसाराम बापू आश्रम परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. एसपींनी सांगितले की, ते जिल्हाधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि मुलीची ओळख पटवली. ही तीच मुलगी होती जी 5 एप्रिल रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. कारमध्ये मुलीचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे एसपींनी सांगितले. (हेही वाचा: बेंगळुरूमधील 6 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू)

अद्याप कारची ओळख पटली नाही. संत आसाराम बापू आश्रम परिसरात नक्की कोणाची कार उभी आहे? मुलगी तिथे कशी आली? दोन दिवस मृतदेह गाडीतच पडून होता, अशा बेवारस गाडीबाबत कोणातीही दखल का घेतली नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.