gold concealed in bra | (Photo credit: archived, edited, and only representative images)

स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सोने तस्करांनी सोने तस्करीसाठी अनेक मार्ग आणि पद्धती वापरल्याचे तुम्ही पाहिले, वाचले असेल. परंतू, चेन्नई विमानतळावर (Chennai International Airport) अटक करण्यात आलेल्या एका महिला सोने तस्कराने सोने तस्करीसाठी वापरलेली पद्धत पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले. क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप असे या महिला सोने तस्कराचे नाव आहे. पोलिसांनी तिला चेन्नई विमानतळावरुन अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप या महिलेने चक्क आपल्या ब्रामध्ये सोनं लपवलं होता. ती बँकॉकहून चेन्नईला आली होती. अशा प्रकारे सोने तस्करी करण्याची बहुदा हा पहिलाच आरोपी असावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बँकॉकहून चेन्नईला आलेली 38 वर्षीय क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप ही महिला फूल बॉडी स्कॅनरमधून जात होती. या वेळी विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिच्याकडे कोणतातरी धातू असल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांनी तिला थांबण्यास सांगून तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला मशीनमध्ये या महिलेकडे धातू असल्याचे दाखवले जात होते. पण, तो धातू नेमका कोठे आहे याबाबत मात्र स्पष्ट होत नव्हते. अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली असता तिच्याकडे सोने असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या महिलेने ब्रामध्ये एक चोरकप्पा तयार केला होता. या चोरकप्यात तब्बल 47 लाख रुपयांचे सोने लपवले होते. या चोरकप्यात लपवलेल्या सोन्याच्या विटा पाहून पोलीसही चक्रावले.

या महिलेकडे पोलीस अजूनही तपास करत आहेत. दरम्यान, ही महिला भारतामध्ये पहिल्यांदाच आल्याचे समजते. भरपूर पैसे आणि मोफत भारत प्रवास करण्याची संधी मिळत असल्याने अनेक महिला, पुरुष हे सोने तस्करीत ओढले जातात. आंतरराष्ट्रीय सराईत गुन्हेगार आणि तस्करीच्या धंद्यातील बडे मासे अशा विदेशी पर्यटकांना जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडून सोने तस्करी करुन घेतात. क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप ही महिलासुद्धा अशाच प्रवाशांपैकी एक असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा, पँटमधल्या जिंवत सापामुळे तरुणाची रवानगी तुरुंगात, सुरु होण्याआधीच संपला विमानप्रवास)

दरम्यान, चेन्नई विमानतळाबाहेरून पोलिसांनी आणखी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. हा इसम चंदिगड येथील छोटा सोनेव्यापारी असल्याचे समजते. लवलीन असे या इसमाचे नाव आहे. लवलीन हा क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप हिला भेटण्यास आला होता. त्याच्याकडे क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप हिचा व्हॉट्सअॅप डिपी होता. तिला पाहताच तो तिच्या दिशेने धावला. पण, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने लवलीन याला त्याच्या हालचालीसकट टीपले. त्यांनी त्याला जागेवरच अटक केली. त्याच्याकडे पुढील चौकशी सुरु आहे. प्राप्त माहिती अशी की, लवलीन याची प्रेयसी ही बँकॉकला असते. तिथूनच तिने क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप हिच्यामार्फत सोन्याच्या विटा भारतात पाठवल्या होत्या. हे दोघे मिळून सोने तस्करी करात असावेत असा संशय आहे.