Representational images (PC - File Photo)

उत्तर प्रदेशमधील हाथसर येथील बलात्काराच्या (Rape) घटनेचा देशभरात निषेध केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना आता, तेलंगणा (Telangana) मधून हृदय विदारक प्रकरण समोर आले आहे. 13 वर्षाच्या दलित अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला, या गोष्टीचा मुलीने विरोध केला असता तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. तेलंगणाच्या खम्मम (Khammam) जिल्ह्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर मालकाच्या मुलाने बलात्काराचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात भाजल्याने पीडित मुलीला खाम्मम जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

पोलिसांनी सांगितले की पीडितेच्या तक्रारीनंतर 26 वर्षीय आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. त्याचवेळी आरोपीचे वडील सुब्बाराव यांनी आपल्या मुलावरील आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. वडिलांचे म्हणणे आहे की आपल्या मुलाने मुलीला जाळले नाही, तर तिने स्वत:च पेटवून घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 13 वर्षाच्या दलित अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी अल्लाम सुब्बाराव या व्यावसायिकाच्या घरी काम करण्यासाठी पाठवले होते. 18 सप्टेंबर रोजी सुब्बारावच्या मुलाने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याचा विरोध केला असता, आरोपी संतप्त झाला आणि त्याने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. मुलीला गंभीर अवस्थेत आरोपीच्या वडिलांनी रुग्णालयामध्ये दाखल केले. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. (हेही वाचा: बिजनोर येथे महिलेला बाजेला बांधून जाळले; पीडितेवर बलात्कार झाल्याचा उत्तर प्रदेश पोलीसांना संशय)

मुलीची तब्येत अजूनच खराब झाल्यांनतर, तिच्या वडिलांना सांगण्यात आले की घरीच काम करताना मुलीचा अपघात झाला व त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खम्मम पोलिसांनी सांगितले की ही, घटना 18 सप्टेंबरची आहे, परंतु सोमवारी ही बाब उघडकीस आली तेव्हा मुलीला शुद्ध आली. त्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना बलात्कार आणि जाळण्याच्या प्रयत्नाबद्दल सांगितले.  पीडित मुलीच्या आई-वडिलांनी त्वरित पोलिसांनशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.