काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात मोबाईलचे उत्पादन होत नव्हते, पण आता जवळपास 200 मोबाईल कंपन्या भारतात त्यांचे फोन तयार करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी भारतात आहे, जी सॅमसंगची आहे. परंतु मोबाईलचे उत्पादन जरी देशात होत असले तरी त्याचे सुटे भाग आणि कच्च्या मालासाठी चीन किंवा तैवानवर अवलंबून राहावे लागत आहे. आता टाटा समूह (Tata Group) ही साखळी तोडण्याच्या तयारीत आहे.
काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की, टाटा समूह भारतात मोबाईल पार्ट्स तयार करेल आणि आता असे वृत्त आहे की टाटा समूह मोबाईल पार्ट्स फॅक्टरीसाठी 45,000 लोकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, जगप्रसिद्ध आयफोनचे पार्ट्स सर्वप्रथम टाटाच्या कारखान्यात तयार केले जातील. तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या टाटा समूहाच्या प्लांटमध्ये पुढील 18 ते 24 महिन्यांत 45,000 महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कारखान्यात सध्या 10,000 कामगार आहेत व यातील बहुतेक महिला आहेत. आता टाटा अजून 45,000 महिलांची भरती करण्याच्या तयारीत आहे. होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना 500 एकरांवर पसरलेला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आदिवासी समाजातून आलेल्या 5,000 महिलांना या प्लांटमध्ये नोकऱ्या मिळाल्या. या संदर्भात टाटा समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अॅपलने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. (हेही वाचा: सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना तब्बल 40 टक्के भारतीयांची फसवणूक; अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती)
या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने महिला कर्मचार्यांची एकाचवेळी नियुक्ती करण्यामागील कारण म्हणजे टाटाला त्यांची उत्पादन क्षमता वाढवायची आहे. 2017 मध्ये Apple ने भारतात आयफोन निर्मिती सुरू केली. पण त्याची उत्पादन क्षमता खूपच कमी होती.
टाटाने या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर भारत चीनच्या समांतर एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येऊ शकेल. टाटा समूहाची विस्ट्रॉनशी चर्चा सुरू आहे. टाटा विस्ट्रॉनच्या सहकार्याने भारतात आयफोन असेंबलिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्याचा विचार करत आहे. टाटा समूह आणि विस्ट्रॉन यांच्यातील करार निश्चित झाल्यास, आयफोन बनवणारी टाटा ही भारतातील पहिली कंपनी ठरेल.