Tamil Nadu: फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू, 36 जखमी; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

सध्या भारत कोरोना विषाणूशी लढा देत आहे. याच संकटामध्ये उत्तराखंड येथे मोठी दुर्घटना घडली. या आघाताचा सामना करीत असतानाच आता तामिळनाडू राज्यातून एक वाईट बातमी समोर येत आहे. तामिळनाडूमध्ये तेथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली असून त्यात 11 जण ठार झाले आहेत. विरुधुनगरमधील या कारखान्यात अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचा भडका उडाला आणि काही समजायच्या आताच आग पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम सुरू केले आहे.

पीएम मोदी यांनी या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याची खंत असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘या दु: खाच्या घटनेत मी शोकग्रस्त कुटूंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लोक लवकरच बरे होतील. अधिकारी पीडितांना मदत करण्यासाठी काम करत आहेत. पंतप्रधान मदत निधीतून प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 2 लाख आणि गंभीर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात येत आहे.’

(हेही वाचा: Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरूचं; आतापर्यंत 36 मृतदेह सापडले, 204 लोक बेपत्ता)

दुपारी 1.45 च्या सुमारास हा अपघात झाला. आग लागल्यानंतर बारच वेळ हे स्फोट होत राहिल्याने बचाव दलांना घटनास्थळाजवळ जाता येणे कठीण झाले होते. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या अपघाताबद्दल दु: ख व्यक्त करीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जखमींना मदत करावी व आत अडकलेल्यांना वाचवावे असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.