Representative Image (Photo Credits: Pixahive)

Surya Namaskar Compulsory In School: राजस्थानच्या (Rajasthan) भजनलाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार (Surya Namaskar) अनिवार्य केले आहेत. शाळेत सकाळच्या प्रार्थनेदरम्यान सूर्यनमस्कार घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील सर्व शाळांमध्ये सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीला सूर्य सप्तमी आहे आणि या दिवशी भजनलाल सरकार यांना सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम करायचा आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी शाळांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांच्या पालकांचाही सूर्यनमस्कारात समावेश केला जात आहे. राजस्थानच्या शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री याबाबत आदेश जारी केला.

दुसरीकडे शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या तयारीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या शक्यतेवर काँग्रेसने आक्षेप व्यक्त केला आहे. काँग्रेस आमदार आणि पीसीसी प्रमुख गोविंद सिंह दोतासरा यांनी शाळांना आरएसएस शाळा बनवण्याऐवजी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे म्हटले आहे. यासह शिक्षकांनीही या निर्णयाला विरोध केला असून, त्यामुळे त्यांचे गैर-शैक्षणिक काम वाढेल आणि विद्यार्थ्यांचा वर्गाचा वेळ वाया जाईल असे त्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसच्या आक्षेपावर शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी काँग्रेसला सूर्यदेवाची अडचण असेल तर सूर्यप्रकाश घेणे बंद करावे, असे म्हटले आहे. दिलावर म्हणाले की, 15 फेब्रुवारीला सूर्य सप्तमी आहे. यानिमित्ताने प्रार्थना सभेत एकत्रितपणे सूर्यनमस्कार करण्याचा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचाही समावेश होणार आहे. 15 फेब्रुवारीनंतर सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे दिलावर यांनी सांगितले. (हेही वाचा: Biggest Tourist Center of India: अयोध्या बनणार देशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र, दरवर्षी 5 कोटी लोक भेट देणार- Jefferies Report)

दरम्यान, याआधी वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात वासुदेव देवनानी हे शिक्षणमंत्री होते. त्या काळात राज्यातील शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यात आले होते. देवनानी यांच्या म्हणण्यानुसार एकूण 8 प्रकारचे योगासने करण्यात आली आणि सूर्यनमस्कारही नियमित केले गेले. नंतर राज्यात सत्तापरिवर्तन होऊन काँग्रेसची सत्ता आली. गेहलोत राजवटीत सरकारने योग आणि सूर्यनमस्कार बंद केले होते.