Biggest Tourist Center of India: अयोध्या बनणार देशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र, दरवर्षी 5 कोटी लोक भेट देणार- Jefferies Report
Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोध्येत राम मंदिराचे (Ayodhya Ram Temple) उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाचा अभिषेक झाला आहे. या कार्यक्रमाची जगभरात पाहायला मिळाली. राम मंदिराचे उद्घाटनासाठी श्रद्धेचे एक महत्वाचे केंद्र असलेल्या अयोध्येचा 85,000 कोटी रुपये खर्च करून मेकओव्हर केला गेला आहे. अयोध्येतील राम मंदिराचे केवळ श्रद्धा आणि अध्यात्मिकदृष्ट्याच महत्व नाही, तर राम मंदिरामुळे सरयू नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात महत्त्वपूर्ण आर्थिक बदल घडून येणार आहेत.

अयोध्येतील राम मंदिराचा भव्य अभिषेक झाल्यानंतर आता दरवर्षी किमान पाच कोटी पर्यटक शहरात येण्याची शक्यता आहे. सुवर्ण मंदिर आणि तिरुपती मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा ही संख्या खूप जास्त आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की, अयोध्येमध्ये विमानतळासारख्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे, यूपीचे हे शहर देशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल.

नवीन विमानतळ, विस्तारित रेल्वे स्थानक, निवासी योजना आणि उत्तम रस्ते संपर्क यासारख्या सुविधांसाठी अयोध्येवर 10 अब्ज डॉलरहून अधिक खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे शहरात नवीन हॉटेल्स सुरू होतील आणि इतर आर्थिक घडामोडी वाढतील. त्यामुळे अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.

जेफरीजच्या मते, धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा विभाग आहे. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधांची कमतरता असूनही दरवर्षी 10-30 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसह नवीन धार्मिक पर्यटन केंद्र (अयोध्या) निर्माण केल्यास मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. अहवालानुसार, पर्यटनाने कोविडपूर्वी म्हणजेच 2018-19 मध्ये जीडीपीमध्ये 194 अब्ज डॉलरचे योगदान दिले. 2032-33 पर्यंत ते 8 टक्के दराने वाढून $443 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

दरवर्षी सुमारे 9 दशलक्ष पर्यटक व्हॅटिकन सिटीला भेट देतात. सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी सुमारे 20 दशलक्ष पर्यटक येतात. आता दरवर्षी 5 कोटींहून अधिक पर्यटक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, अयोध्येतील नवीन विमानतळाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. दररोज 60,000 प्रवासी हाताळण्यासाठी रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात आला आहे. (हेही वाचा: Lakshadweep Travel Guide: लक्षद्वीपला भेट देण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या कसे जाल, योग्य वेळ आणि काय पाहाल)

सध्या अयोध्येत 590 खोल्या असलेली सुमारे 17 हॉटेल्स आहेत. 73 नवीन हॉटेल्स बांधली जात आहेत. इंडियन हॉटेल्स, मॅरियट आणि विंडहॅम यांनी हॉटेल बांधण्यासाठी यापूर्वीच करार केला आहे. एका ट्रॅव्हल कंपनीने शेअर केलेल्या डेटानुसार, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या घोषणेपासून भारतातून इंटरनेटवर अयोध्येचा शोध 1806% वाढला आहे . विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबरला अयोध्येबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले.