Infosys building. (Photo Credit: Wikimedia Commons)

देशातील आयटी कंपनी (IT) क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी इन्फोसिस (Infosys) लवकरच आपल्या 12 हजार कर्मचार्‍यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवणार आहे. अलीकडेच जगातील आघाडीची आयटी कंपनी कॉग्निझंटनेही (Cognizant) तब्बल 13,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. ज्यांचा पगार खूप जास्त आहे अशा कर्मचार्‍यांना याचा फटका बसणार आहे. त्यापाठोपाठ आता इन्फोसिसनेही आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे ठरवले आहे. कंपनीमधील खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले गेले आहे.

‘या’ बँडमध्ये 10 टक्के कपात -

कंपनीने जेएल 6 बँडमध्ये काम करणाऱ्या 2200 (10 टक्के) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या बँडमध्ये बहुतेक लोक हे सिनियर लेव्हलवर काम करणारे आहेत. कंपनीच्या मिड बँडमध्ये म्हणजे जेएल 6, जेएल 7 आणि जेएल 8 बँडमध्ये सुमारे 3092 कर्मचारी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी जेएल 3, जेएल 4 आणि जेएल 5 बँडमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचार्‍यांपैकी दोन ते पाच टक्के कर्मचार्‍यांकाढून टाकेल. त्यानुसार या बँडमध्ये काम करणाऱ्या  चार हजार ते दहा हजार कर्मचार्‍यांवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे. अशाप्रकारे या तिमाहीत कंपनी एकूण 12200 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.

50 वरिष्ठ अधिकारी बाहेर असतील -

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कंपनीमध्ये जवळजवळ 50 लोकांना सहाय्यक उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते. अशा सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. (हेही वाचा: इन्फोसिसला मोठा झटका; काही मिनिटांमध्ये बुडाले 45 हजार कोटी रुपये)

कंपनीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना काढून टाकण्यात येणार आहे. गेल्या दोन तिमाहीपासून कंपनीने आपल्या बर्‍याच कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. टेक सेवेत काम करणारे 18 टक्के कर्मचारी स्वत:हून निघून गेले आहेत आणि 19.4 टक्के कर्मचारी स्वतंत्रपणे निघून गेले आहेत. या व्यतिरिक्त बाहेर गेलेल्या सर्व कर्मचार्‍यांना कंपनीने असे करण्यास सांगितले आहे.