Road Accident

गाझियाबादमध्ये एक मोठा रस्ता अपघात समोर आला आहे. यामध्ये तीन महिलांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर रेवडी-रेवडा गावाजवळ शनिवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कँटरला धडक दिली. या अपघातात कंटेनरमधील तीन महिलांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना गाझियाबाद आणि दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये आई आणि मुलाचाही समावेश आहे. सर्व लोक हरियाणातील गणौर येथील वीटभट्टीवर काम करत होते आणि अपघाताच्या वेळी ते उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर आणि हरदोई येथे परतत होते. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला. (हेही वाचा - Kolhapur Accident: कोल्हापूर मध्ये ऑटो-मोटारसायकल यांच्यात धडक; 6 जखमी)

हरियाणातील गणौर येथील वीटभट्टीवर काम करणारे 37 मजूर कंटेनरमधून ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे मार्गे शाहजहानपूर आणि हरदोई येथील त्यांच्या घरी परतत होते. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले प्रवास करत होते. रेवडी-रेवडा गावाजवळ काही मजूर शौचालयाला जाण्यासाठी कँटरमधून खाली उतरले. चालकाने कँटर रस्त्याच्या कडेला उभा केला.

दरम्यान, हरियाणाकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने मागून उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ट्रकच्या पुढील भागाचा आणि कँटरच्या मागील भागाचा चक्काचूर झाला. यावेळी चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात आठ मुलेही जखमी झाली आहेत.