Mucormycosis च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र; पहा काय म्हणाल्या
Sonia Gandhi & PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस संसर्गाच्या पाठोपाठ ‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) चा संसर्ग देशात वाढू लागला आहे. त्यावरील औषधांचा तुटवटा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्युकरमायकोसिस वरील औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध केला जावा. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या Liposomal Amphotericin-B च्या तुटवड्याप्रकरणी त्वरीत पाऊलं उचलावी. तसंच आरोग्य विम्यामध्ये म्युकरमायकोसिसला कवर करण्याची विनंती देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे. (Covid-19: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सुचवले 'हे' उपाय)

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले, "म्युकरमायकोसिसला सरकारने गंभीर आजार म्हणून घोषित करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि विनामुल्य उपचार हे सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी Liposomal Amphotericin-B हे औषध गरजेचे असून याची उपलब्धता हळूहळू कमी होत आहे. तसंच भारत सरकारच्या आयुषमान भारत आणि इतर आरोग्य विमांमध्ये या आजाराचा समावेश केलेला नाही. यावर लवकरात लवकर पाऊलं उचलून म्युकरमायकोसिसने पीडित असलेल्या रुग्णांची मदत करा."

सोनिया गांधी यांचे पत्र:

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना आणि पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी औषधाचा पुरेशी उपलब्धता, मोफत उपचार देण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. यापूर्वी देखील कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे किंवा इतर अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर सोनिया गांधी यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.