कोरोना विषाणू (coronavirus) महामारी कमी होत असल्याची चिन्हे दिसून लागल्यावर भारतीय रेल्वेने (Indian Railways) मोठ्या जोमात काम सुरु केले आहे. सध्या रेल्वेची उत्तम सेवा आणि टूर पॅकेजेससाठी चर्चा होत आहे. त्यात आता भारतीय रेल्वे एक नवी, अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्याचा विचार करीत आहे. IRCTC लवकरच स्लीपिंग पॉड्स (Sleeping Pods) सेवा सुरू करणार आहे. हे पॉड्स सर्वप्रथम मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर स्थापन केले जाणार आहेत. पॉड्समध्ये प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ही विशेष सेवा जपानमध्ये सुरू झाली होती, दिल्ली विमानतळावरही ही सुविधा उपलब्ध आहे.
IRCTC रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अनोखी संकल्पना घेऊन येत आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर लवकरच पॉड्स रिटायरिंग रूम उपलब्ध असतील. यासाठी IRCTC ने मेसर्स अर्बन पॉड प्रायव्हेट लिमिटेडशी करार केला आहे. कंपनी हे पॉड्स 9 वर्षांसाठी चालवेल. मुंबई सेंट्रलमधील स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे पॉड्स सुरु केले जातील. ही पॉड्स रिटायरिंग रूम 3000 चौरस फुटांपर्यंत पसरलेली आहे. ही साइट 21 फेब्रुवारी 2021 रोजी ऑपरेटरला देण्यात आली होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे, ऑक्टोबर 2021 च्या अखेरपर्यंत हे पॉड्स प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होतील असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
IRCTC कडून प्रवाशांना कॅप्सूल आकाराचे बेड (स्लीपिंग पॉड्स) उपलब्ध करून देण्यात येतील. हे पॉड्स तुम्ही किती तास वापरता, त्यानुसार तुम्हाला त्याचे शुल्क भरावे लागेल. मात्र, त्याचा दर किती असेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र ही किंमत प्रति व्यक्ती 12 तासांसाठी 999 रुपये आणि 24 तासांसाठी प्रति व्यक्ती 1999 रुपये किंवा त्याहून जास्त असू शकते. (हेही वाचा: TV पाहणे होणार महाग, जाणून घ्या 1 डिसेंबर पासून लागू होणारे नवे दर)
एकूणच, रेल्वे प्रवाशांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल, ज्यामध्ये कमी खर्चात उत्तम सुविधा उपलब्ध होतील. स्लीपिंग पॉड्स सेवेचा सर्वात मोठा फायदा अशा प्रवाशांना होईल जे लांबच्या प्रवाशानंतर स्टेशनवर थांबणार आहेत किंवा ट्रेन पकडण्यासाठी जे प्रवासी स्टेशनवर येतात. यामध्ये मोफत वाय-फाय, लगेज रूम, प्रसाधन साहित्य, शॉवर रूम, शौचालय, टीव्ही, लहान लॉकर, एअर कंडिशनर, मोबाईल चार्जिंग, स्मोक डिटेक्टर, डीएनडी इत्यादींचा समावेश आहे.