चेन्नई येथे कोरोना विषाणूच्या (Coronavirus) कोविशिल्ड (Covishield) लसीची चाचणी सुरू आहेत. अशात या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार केली होती. याबाबत त्याने सीरम संस्थेसह (Serum Institute) इतर काही संस्थांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या प्रकरणी 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई व या लसीची ट्रायल थांबवण्याची मागणीही केली आहे. सध्या सर्वजण आतुरतेने कोरोना लसीची वाट पाहत असताना, या व्यक्तीने सीरमवर केलेले आरोप माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूटने पेशंटचे आरोप फेटाळून लावले आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, ‘रूग्णाबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. परंतु लस चाचणी व खराब आरोग्य यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ही व्यक्ती स्वतःच्या बिघडत चाललेल्या प्रकृतीसाठी विनाकारण सीरम संस्थेला दोष देत आहे.’ या व्यक्तीने चाचणी लस असुरक्षित म्हणून त्याची चाचणी, उत्पादन आणि वितरण रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच असे न घडल्यास त्याविरूद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाबाबत, कोविशील्ड लस बनवण्यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषधनिर्माण कंपनी अॅस्ट्रॅजेनेका यांच्याशी करार केलेल्या पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीसीबाबत बोलताना कंपनीने सांगितले की, ‘अशा प्रकारच्या खोट्या आरोपांविरूद्ध कंपनी स्वत: चा बचाव करेल आणि असे चुकीचे आरोप केल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर 100 कोटी रुपयांपर्यंतचा मानहानीचा दावाही करू शकेल. (हेही वाचा: Coronavirus Vaccine च्या ट्रायलमुळे निर्माण झाले साईड इफेक्ट्स; चेन्नईच्या व्यक्तीने Serum Institute कडे मागितली 5 कोटींची नुकसान भरपाई)
एसएसआय व्यतिरिक्त, लसीचे स्पॉन्सर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि त्या व्यक्तीला लसीकरण करणारे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेलाही या व्यक्तीने नोटीस पाठवली आहे. या व्यक्तीचा असा आरोप आहे की, लसीकरणानंतर त्याला तीव्र एन्सेफॅलोपॅथी, मेंदूची हानी किंवा आजार झाला आहे आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अशी पुष्टी झाली आहे की, लसीच्या चाचणीने त्याचे आरोग्य बिघडले आहे. या व्यक्तीला 1 ऑक्टोबर रोजी लसी देण्यात आली होती.