तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातून एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक आई आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करवत होती. हा बलात्कार दुसरा तिसरा कोणी नाही तर या कलियुगी मातेच्या प्रियकरच करत असे. बलात्कार करून मुलगी गरोदर राहावी हा या दोघांचा हेतू होता. त्यानंतर हे दोघे मुलीची स्त्रीबीजे (Egg) रुग्णालयात विकायचे. त्या बदल्यात मिळणाऱ्या पैशातून ते दोघेही ऐश करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील आहे. या महिलेचा पतीपासून दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे व ती आपली अल्पवयीन मुलगी आणि प्रियकरासह राहत आहे.
2017 मध्ये या दोघांनी मुलीसोबत हे विकृत कृत्य करायला सुरुवात केली. हा मुलीच्या शरीराचा आणि गर्भाचाही सौदा होता. ही महिला तिच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराकरवी बलात्कार करवत असे, व त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्यावर तिची स्त्रीबीजे स्थानिक रुग्णालयात विकली जात असत. एक दिवस संधी साधून या 16 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार केली.
प्राथमिक तपासानंतर तामिळनाडू पोलिसांना हे प्रकरण खरे असल्याचे आढळून आले आणि त्यांनी मुलीची आई, आईचा प्रियकर आणि अन्य एका महिलेला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. यामागे संपूर्ण नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना अटक करण्यात येईल. एस. इंद्राणी उर्फ सुमिया असे या 38 वर्षीय महिलेचे नाव आहे, तर तिच्या 40 वर्षीय प्रियकराचे नाव ए. सईद अली आहे.
तामिळनाडूतील इरोड, पेरुंडुरुई, सेलम आणि होसूर जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांमध्ये मुलीची स्त्रीबीजे विकली गेली होती. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक 36 वर्षीय महिला के. मालती दलालच्या भूमिकेत होती. पीडितेने सांगितले की, प्रत्येक वेळी ती गरोदर राहिल्यावर तिची स्त्रीबीजे विकून हॉस्पिटलमधून 20 हजार रुपये मिळत असे. यातील 5 हजार रुपये एक महिला कमिशन म्हणून घ्यायची आणि उर्वरित रक्कम आई आणि तिचा प्रियकर घ्यायचे. असे वर्षातून दोनदा केले जात होते. गेल्या चार वारःस्त कमीत कमी आठ वेळा मुलीची स्त्रीबीजे विकली गेली आहेत. (हेही वाचा: मद्यधुंद व्यक्तीने 82 वर्षीय महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून धारदार शस्त्राने केली इजा, पीडितेचा मृत्यू)
राज्याच्या आरोग्य सचिवांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत, आयपीसी कलम 420, 464, 41, 506 (ii), POCSO कायदा, आधारचा गैरवापर यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही डॉक्टर आणि दलालांची ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.