घरात लग्नाची बायको असून बाहेर अफेअर करणाऱ्या लोकांची तारांबळ आपण अनेक मालिका-चित्रपटांमधून पाहिली असेल. तुमच्या आजूबाजूलादेखील अशी अनेक प्रकरणे तुम्ही अनुभवली असतील. परंतु ओडीसामधून (Odisha) समोर येत असलेले हे प्रकरण पाहून तुम्ही देखील कपाळावर हात मारून घ्याल. दुहेरी जीवन जगणे हे नक्कीच अवघड असू शकते, परंतु ओडिशातील एक माणूस गेली काही वर्षे 14 पत्नींसह 14 भिन्न जीवन जगत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही घटना उघडकीस आली.
या व्यक्तीवर देशाच्या विविध भागात 14 बायका असल्याचा आरोप आहे. रमेश चंद्र स्वेन असे या ओडिशातील 61 वर्षीय रोमियोचे नाव आहे. हा व्यवसायाने तथाकथित होमिओपॅथी डॉक्टर आहे. या डॉक्टरने भुवनेश्वर, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्लीसह विविध शहरातील 14 महिलांशी लग्न केले आहे. याने विविध ऑनलाइन मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर उच्च पात्रता दर्शवून अनेक प्रोफाइल्स तयार केले आहेत. अशा बनावट प्रोफाइल्सचा वापर करून तो देशभरातील महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह करायचा.
एखाद्या महिलेला यावर संशय आल्यास त्यांची संपत्ती लुटायचा आणि तेथून पळून जायचा. 14 पत्नींपैकी एका पत्नीने 2021 मध्ये रमेशविरुद्ध भुवनेश्वर महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या तक्रारीच्या आधारे रमेशला अटक केली आहे. 2011 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनीही त्याला अटक केल्याची माहिती आहे. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना भुवनेश्वरचे डीसीपी उमाशंकर दास म्हणाले की, रमेश सर्वाधिक आसाममध्ये राहिला आहे व आम्ही त्याच्या 14 पैकी नऊ पत्नींशी संपर्क साधला आहे.
त्याने आतापर्यंत किती पैसे लुटले याची माहिती मिळवण्यासाठी त्याची आर्थिक स्थिती तपासण्यात येत आहे. लग्नाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. रमेश प्रामुख्याने अशा महिलांना टार्गेट करत आहे ज्या एकट्या आहेत व त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. अधिक तपासासाठी महिला पोलिसांसह एक विशेष पथक तयार करण्यात येणार असून रमेशला कोठडीत ठेवणार असल्याचे डीसीपींनी सांगितले. (हेही वाचा: Nashik Crime: नाशिकमध्ये प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळले, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच त्याचा मृत्यू)
अटक करण्यात आलेल्या या आरोपी डॉ. रमेश स्वेनचे घर ओडिशातील केंद्रपारा जिल्ह्यातील भगवानपूर येथे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 11 एटीएम कार्ड, 4 आधार कार्ड, वेगवेगळी ओळखपत्रे, एक कार आणि अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. रमेशने स्वत:ची डॉक्टर अशी ओळख करून देऊन गेल्या 20 वर्षांत 7 राज्यांत 14 लग्ने केली.