Makeup (Photo Credit: Pixabay)

याआधी लग्नकार्यात वधूच्या खराब मेकअपमुळे (Makeup) वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. आता कर्नाटकातील (Karnataka) हसनमध्येही मेकअपसंदर्भातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे मेकअप केल्यानंतर होणाऱ्या वधूचा चेहरा इतका बिघडला की, तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले. यामुळे हे लग्न पुढे ढकलले गेले. ही बाब उघडकीस आल्यानंतर आता ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

हसनच्या अरसीकेरे शहरात घडलेली ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जाजूर गावची रहिवासी आहे. पीडितेने 10 दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप करून घेतला होता. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा सुजला. ब्युटीशियन गंगा हिने पीडितेला सांगितले होते की, तिने तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रोडक्ट लावले होते. परंतु मेकअप केल्यानंतर पीडितेला अॅलर्जी झाली.

मुलीची परिस्थिती इतकी बिघडली की, तिला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. वरपक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी अरसीकेरे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Rajkot Shocker: सिगारेट ओढल्याने तरुणाने गमावला आवाज, प्रकृती चिंताजनक)

दरम्यान, याआधी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील एका मुलीला आपला मेकअप बिघडल्याचा इतका राग आला की ती चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. राधिका सेन लग्नापूर्वी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये आली होती, मात्र ब्युटीशियनने तिचा मेकअप खराब केला. यामुळे नाराज झालेली राधिका इतकी संतप्त झाली की ब्युटीशियनची तक्रार करण्यासाठी ती आपल्या नातेवाईकांसह जबलपूरमधील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ब्युटी पार्लरच्या संचालकाने आधी वधूचा मेकअप खराब केला आणि तक्रार केल्यानंतर फोनवर धमकी दिली.