1 Man Conned 50 Women For Marriage: लग्नाच्या बहाण्याने केली तब्बल 50 मुलींची फसवणूक; मॅट्रिमोनिअल साइटवर करायचा मैत्री, पोलिसांकडून 27 वर्षीय आरोपीला अटक
Arrest (PC -Pixabay)

मॅट्रिमोनिअल साइटवर (Matrimonial Websites) मैत्री करून लग्नाच्या बहाण्याने मुलींवर बलात्कार करणाऱ्या आणि पैशांची फसवणूक करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. सांगानेर पोलिसांनी हरियाणातील अंबाला येथील आरोपी सय्यद खान खवर अली याला अटक केली आहे. सय्यद मॅट्रिमोनिअल साइटवर मुलींना टार्गेट करून लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करायचा.

6 मे रोजी, एका पीडितेने सांगानेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की तिने विवाहासाठी तिचा बायोडाटा मॅट्रिमोनिअल साइटवर अपलोड केला होता, ज्यावर आरोपी सय्यदने संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा वकील म्हणून करून दिली होती. तसेच त्याचा सिंगापूरमध्ये व्यवसाय असल्याचेही त्याने सांगितले.

यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. दोन महिने हे बोलणे चालल्यानंतर आरोपी सय्यद 27 एप्रिल रोजी मुलीला भेटण्यासाठी जयपूरला आला होता. विविध कारणे सांगून तो जयपूरमध्येच थांबला. निघताना त्याने पिडीत मुलीचे सोन्याचे दागिने आणि महागडे घड्याळ चोरून नेले. पीडितेच्या तक्रारीनंतर जयपूर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार केली. अखेर पोलिसांनी आरोपीला पकडले. चौकशीत आरोपी सय्यदने अनेक राज्यात जवळपास 50 मुलींची फसवणूक केल्याचे मान्य केले. (हेही वाचा: Rajasthan Jungle Rape Case: प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार)

लग्नाच्या बहाण्याने पैसे उकळणे, मुलींचे लैंगिक शोषण करणे अशा बाबीही आरोपीने मान्य केल्या. यासोबतच आरोपीने अनेक मुलींच्या घरात चोरीचेही गुन्हे केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता आरोपी सय्यदचे जुने घर दिल्लीतील लाजपत नगर येथे असल्याचे समोर आले. तिथल्या पत्त्यावरूनच दरवेळी नवे सिम घ्यायचा. त्यामुळे आरोपीची ओळख पटू शकली नाही. दर तीन-चार महिन्यांनी तो नवीन मुलींना मॅट्रिमोनिअल साइट्सवर आपल्या जाळ्यात अडकवत होता. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.