Shocking! 2 महिन्यांच्या बाळाला उचलून घेऊन गेले माकड; पाण्याच्या टाकीत टाकले, मुलाचा मृत्यू 
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत (Bagpat) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यांच्या चिमुरड्याला माकडाने (Monkey) पळवून नेले आणि पाण्यात बुडवून त्याला मारून टाकले. रात्रीच्या सुमारास टेरेसवरून माकडाने या मुलाला उचलून नेल्याचे सांगण्यात आले. सकाळी पाण्याच्या हौदात मुलाचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून मुलाला माकड घेऊन गेल्याचे समजले.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढी कलंजरी गावात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास प्रिन्स कसाना यांचा दोन महिन्यांचा मुलगा केशव त्याची आई कोमलसोबत झोपला होता. रात्री कोमल काही वेळ कामासाठी खोलीबाहेर गेली. ती परत आली तेव्हा मुलगा बेपत्ता होता. तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबात खळबळ उडाली आणि सर्वांनी मुलाचा शोध सुरू केला. माहिती मिळताच पोलीस स्टेशनही घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि ग्रामस्थांनी रात्रभर मुलाचा शोध घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबीयांनी जेव्हा घराच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत पाहिले तेव्हा तिथे केशव मृतावस्थेत आढळला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, जिथे मुलाला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबात शोकाचे वातावरण आहे. अनेकवेळा मागणी करूनही गावातील माकडे पकडली जात नसल्याबद्दल गावात अधिकाऱ्यांविरोधात रोष आहे. (हेही वाचा: Shocking! दोन मुलांनी आईची लावून दिली 6 लग्ने; समोर आले धक्कादायक कारण)

कुटुंबीयांनी सांगितले की, 15 डिसेंबरलाही माकड केशवला घेऊन गेले होते. माकड त्याला घेऊन छतावर जात असतानाच मुलाच्या वजनामुळे माकडाच्या हातातून मूल खाली पडले, ज्यावेळी त्याचा जीव थोडक्यात वाचला. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.