Priyanka Chaturvedi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (UBT) राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी महिला आणि मुलांची सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने दोन गंभीर विधेयकांना (Women’s Safety Bill) जलद मंजुरी देण्याची विनंती केली आहे. ही विधेयके उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तीन वर्षांपूर्वी मंजूर केली होती आणि तेव्हापासून ती राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. आपल्या पत्रात चतुर्वेदी यांनी या विधेयकांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, "रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर, मी राष्ट्रपती मुर्मू यांना या विधेयकांना जलद मंजुरी देण्याचे आवाहन केले आहे. या विधेयकांना संमती देणे ही "राज्यातील आणि देशाच्या महिलांना रक्षाबंधनाची सर्वात योग्य भेट असेल, असेही त्या म्हणाल्या.

गुन्हेगारी कायदा विधेयक एकमताने मंजूर

महाराष्ट्र विधानसभेने डिसेंबर 2021 मध्ये शक्ती गुन्हेगारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 एकमताने मंजूर केले होते. या विधेयकात बलात्कारासाठी फाशीची शिक्षा आणि ॲसिड हल्ले आणि मुलांवरील लैंगिक अत्याचारासाठी कठोर शिक्षेचा समावेश आहे. याशिवाय, तक्रार नोंदवल्यापासून 30 दिवसांच्या आत अशा गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे आवाहन कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप दरम्यान एका महिला डॉक्टरच्या क्रूर लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर आले आहे. ज्याने भारतातील महिलांच्या सुरक्षेबद्दल जनक्षोभ निर्माण केला आहे. "2012 च्या निर्भया प्रकरणापासून, हातरस आणि कठुआ सारख्या घटनांनी आणि इतर अनेक घटनांनी आमच्या कायदेशीर व्यवस्थेवरील महिलांचा विश्वास डळमळीत केला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, भारतातील करोडो महिलांच्या वेदना, भीती आणि संताप न्याय्य आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची आणि जलद न्याय देण्याची नितांत गरज आहे. एक सहकारी महिला या नात्याने मला खात्री आहे की राष्ट्रपती मुर्मू यांच्या मते या भावना विचारात घेऊन विधेयकास मंजूरी देतील. (हेही वाचा, Uddhav Thackeray on CM Candidate: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची गुगली; चेंडू काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात)

एक्स पोस्ट

'महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक विधेयक'

प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूर केलेली विधेयके, महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक म्हणून वर्णन केली आहेत. ही विधेयके 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांनी व्यापक चर्चेनंतर मंजूर केली. तथापि, राष्ट्रपतींच्या संमतीच्या प्रतीक्षेत, ती अपूर्णावस्थेत राहिली आहेत. चतुर्वेदी यांनी यावर जोर दिला की मंजूरीतील विलंबामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे, विशेषत: महिला आणि मुलांवरील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे या चिंतेत अधिक भर पडली आहे.