यंदा पुन्हा एकदा मान्सून लांबला आहे. अर्धा जून उलटला तरीही अनेक ठिकाणी पावसाची चिन्हेही दिसली नाहीत. अशात भारतीय हवामान खात्याने (IMD) उष्णतेबाबत नवीन चेतावणी जारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, विदर्भ, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यासह इतर अनेक राज्यांमध्ये ‘गंभीर ते अतिशय गंभीर’ उष्णतेच्या लाटेचा (Severe to Very Severe Heatwave) अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा अजूनही कायम राहणार असल्याने भारताला लवकर उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यानंतरही अनेक राज्यांमध्ये उन्हाच्या झळा जाणवत आहेत. यामुळे शाळांची सुट्ट्या वाढवण्यास भाग पाडले जात आहे. सध्या उत्तर प्रदेश आणि बिहार मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट अनुभवत आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाटणा जिल्हा सरकारने इयत्ता 12वीपर्यंतच्या वर्गांना उन्हाळी सुट्या वाढवल्या आहेत. बिहारसह, इतर अनेक राज्यांनी त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत.
पुढील चार दिवसांत ओडिशा, विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट निर्माण होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. बंगाल तसेच झारखंडमधील लोकही पुढील 3 दिवस कडक उन्हाचा सामना करतील. आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्व मध्य प्रदेशात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा प्रकोप जाणवेल. तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम मध्य प्रदेशमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहील. छत्तीसगडमध्येही अशीच परिस्थिती राहील. (हेही वाचा: UP-Bihar Heatwave: उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 98 जणांचा मृत्यू)
हवामान खात्याच्या मते, पुढील तीन दिवसांत मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील सर्वोच्च तापमानात लक्षणीय बदल होणार नाही. परंतु त्यानंतर, 2-4 अंश सेल्सिअसची घट अपेक्षित आहे. दरम्यान, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे.