स्वयंघोषित बाबाचा प्रताप; पाच विवाह, भावाच्या पत्नीवर बलात्कार व 32 मुलींशी चॅटिंग सुरु असताना सहाव्या लग्नाची तयारी, पोलिसांकडून अटक
Godman (Photo credits: File Image)

तुम्हाला ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटाची कहाणी आठवते? चित्रपटाच्या नायकाला काही कारणास्तव चार लग्न करावी लागली होती. ती झाली रील लाइफची गोष्ट, परंतु आता कानपूरच्या (Kanpur) किदवई नगर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी या चित्रपटाच्या कथेच्या दोन पाऊल पुढे गेलेल्या एका स्वयंघोषित बाबाला (Self-Proclaimed Baba) पकडले आहे. हा बाबा शाहजहांपूर निवासी असून त्याचे नाव अनुज चेतन कठेरिया (Anuj Chetan Katheria) आहे. या बाबाने आतापर्यंत पाच विवाह केले आहेत. आपले आधीचे पाच विवाह लपवून अनुज सहावे लग्न करण्याची तयारी करत होता. बाबा आपल्या योजनेमध्ये यशस्वी होण्यापूर्वी पोलिसांनी त्याला पकडले.

अनुजने आपले चार विवाह लपवून श्याम नगरातील एका महिलेबरोबर पाचवे लग्न केले होते. या पाचव्या पत्नीने पोलिसांना संपूर्ण सत्य सांगितले. तिने माहिती दिली की, अनुज नाव आणि धर्म बदलून लग्ने करत आहे. पाचव्या लग्नानंतर अनुजने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. या संदर्भात पत्नीने गेल्या वर्षी चाकेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी जेव्हा बाबाबद्दल तपास सुरु केला, तेव्हा समोर आले की शाहजहांपूरच्या निगोही पोलिस स्टेशन भागात मां कामख्या, बंजारे बाबा कल्याण सेवा ट्रस्ट या नावाने अनुजने तंत्र-मंत्राचा अड्डा सुरु केला आहे.

याच ठिकाणी आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या युवतींना तो आपल्या जाळ्यात ओढत असे. अनुजने शादी डॉट कॉमवरही आपली प्रोफाइल बनवली आहे. याठिकाणी त्याने आपले नाव लकी पांडे असे नमूद केले आहे. पोलिस तपासात अनुज सुमारे 32 मुलींशी चॅटिंग करत असल्याचे समोर आले. याठिकाणी कधी तो स्वतःची ओळख शिक्षक म्हणून सांगतो, तर कधी हॉटेल मालक असल्याचे सांगतो. इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतलेला अनुज आपण बीएससी पास असल्याचे सांगतो.

(हेही वाचा: आंध्र प्रदेश: घरातल्यांनी 30 हजार रुपयांचा कुत्रा खरेदी करण्यास दिला नकार, 16 वर्षीय मुलाने केली आत्महत्या)

सध्या अनुजची पहिल्या दोन पत्नींसोबत घटस्फोटाची केस सुरु आहे. त्याची तिसरी पत्नी त्याला सोडून गेली आहे. चौथ्या पत्नीने त्याचे सत्य समोर आल्यानंतर आत्महत्या केली. पाचव्या पत्नीने आता पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महत्वाचे म्हणजे अनुजच्या धाकट्या भावाच्या पत्नीने 2016 मध्ये हजहांपुरच्या निगोही पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आता अनुजला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.