Sansad TV: देशाला लवकरच मिळणार नवी वाहिनी; PM Narendra Modi 15 सप्टेंबर रोजी करणार 'संसद टीव्ही'चे लोकार्पण
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

देशाला 'संसद टीव्ही' (Sansad TV) स्वरूपात नवीन संसद वाहिनीची सेवा पुढील आठवड्यात उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी याचे लोकार्पण करणार आहेत. हे चॅनेल लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीच्या विलीनीकरणाद्वारे तयार केले गेले आहे. सरकारी सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. करण सिंह, अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि वकील हेमंत बत्रा संसद टीव्हीवर विविध कार्यक्रम सादर करतील. सूत्रांनी सांगितले की, संसद टीव्ही हे एक प्रकारची सेरेब्रल टीव्ही चॅनेल असेल.

हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून उच्च दर्जाचे कंटेंट प्रसारित करेल. यामध्ये, विशेषत: देशातील लोकशाही मूल्ये आणि संस्थांविषयी माहिती प्रसारित केली जाईल. जेव्हा संसदेच्या अधिवेशनाची बैठक होईल, तेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज संसद टीव्हीच्या दोन वाहिन्यांवर थेट प्रसारित केले जाईल. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत चॅनेल औपचारिकरित्या 'लाँच' केले जाईल.

करण सिंह विविध धर्मांवर कार्यक्रम आयोजित करतील तर बिबेक देबरॉय इतिहास आणि अमिताभ कांत भारताच्या परिवर्तनावर कार्यक्रम करतील. हेमंत बत्रा कायदेशीर विषयांवर कार्यक्रम करणार आहेत. रवी कपूर, निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आणि माजी सचिव, वस्त्रोद्योग मंत्रालय हे संसद टीव्हीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत, तर लोकसभा सचिवालयातील सहसचिव मनोज अरोरा हे त्याचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) आहेत. (हेही वाचा: Indian Farmers: भारतातील 50% शेतकरी कर्जाच्या विळख्यात, प्रत्येक कुटंबावर सरासरी 74,121 रुपयांचे कर्ज- अहवाल)

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण पर्वाच्या उद्घाटन परिषदेत शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांची सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, देशातील शिक्षणासाठी आणि कठीण काळात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सर्व शिक्षकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.