माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात असताना हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी अतिकला संपवून आत्मसमर्पण केलं, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या हत्येनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
खरंतर दुसऱ्या राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलणं चुकीचं वाटतं. तिथल्या पोलीस चकमकी असतील, राज्यात लावलेलं १४४ कलम असेस, तिथलं सरकार तिथली परिस्थिती सांभाळायला सक्षम आहे. परंतु पोलीस बंदोबस्तात आणि लोकांच्या डोळ्यादेखत हत्या झाली हे गंभीर आहे.असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पोलीस अतिक अहमदला वैद्यकीय महाविद्यालयात नेत होते. त्याचवेळी रुग्णालयाबाहेर ही हत्या होते. मुळात गुंड असो, माफिया असो किंवा आणखी कोणी असेल, पोलिसांच्या गराड्यात, माध्यमांच्या समोर हत्या होत असेल तर हे गंभीर आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ते (अतिक अहमद) याआधी अनेक वर्ष आमदार होते, खासदार होते, हे विसरता येत नाही. पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरी तिथे घुसले आणि त्यांनी हत्या केली, यामुळे तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.