Salary | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ (Salary Hike In Private Sector) होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी काळात लॉकडाऊन असला तरी अनेक क्षेत्रांमध्ये चागलाच नफा झाला आहे. आर्थिक वर्ष 2021/22 मध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची लाट असूनही या कंपन्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी 9.4% इतकी वेतनवाढ देण्याची शक्यता आहे.  ही पगारवाढ (Salary Hike) पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मिळणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. केंद्र सरकार आणि अनेक राज्यांनी सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची पगारवाढ (भत्ते) नुकतीच केली आहे. त्यानंतर आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

एऑनच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या 26 व्या वार्षिक वेतन वृद्धी सर्वेनुसार 2022 बाबत अनेक कंपन्या आशादायी आहेत. पुढच्या वर्षी 98.9% कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याच्या विचारात आहेत. 2021 मध्ये 97.5% कंपन्यानी भविष्यात कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत भाष्य केले आहे. सर्व्हेमध्ये म्हटले आहे की, विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांचे व्यवस्थापन सकारात्मक आहे. अनेक कंपन्या असे मानत आहेत की, 2021/22 मध्ये वेतनवाढ 2018-19च च्या पातळीवर पोहोचू शकेल. एऑनच्या रुपंक चौधरी यांनी म्हटले की, भविष्यात अर्थव्यवस्था मजबूतीकडे जाण्याची ही चिन्हे आहेत. 2020 मध्ये वेतनवाढ 6.1% राहिली. 2021 मध्ये 8.8% तर 20222 मध्ये ही वेतनवाढ 9.4% इतकी होण्याची शक्यता आहे. जी 2018-19 च्या तुलनेत बरोबरीत आहे. (हेही वाचा, गलेलठ्ठ पगार देणारे '५' देश !)

सर्व्हेमध्ये असेही पुढे आले की, कोरोना व्हायरस महामाली काळात डिजिटल व्यवहार वाढले. काम करण्याची पद्धतही डिजिटल झाली. वर्क फ्रॉम होम प्रणाली मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. तसेच, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीत बदल (जॉब चेंज) करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली. दरम्यान, कोरोना व्हायरस महामारी काळात अनेक कंपन्यांनी डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. भविष्यात डिजिटल क्षेत्र आर्थिक वृद्धीला हातभार लावेल असा विश्वासही एऑनच्या चौधरी यांना वाटतो.