Sachin Pilot-Sara Abdullah Divorce (संग्रहित संपादित प्रतिमा)

टोंक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील सिव्हिल लाइन्समध्ये बांधण्यात आलेल्या आरओ कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर नामनिर्देशनपत्र सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी झाली होती. तत्पूर्वी, सकाळी साडेअकरा वाजता भूतेश्वर महादेव मंदिरापासून पायलट यांच्या नामांकन रॅलीला सुरुवात झाली, त्यांनी मंदिरात प्रार्थना करून विजयासाठी प्रार्थना केली. मात्र आता सचिन पायलट यांच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा झाला आहे. सचिन पायलट यांचा घटस्फोट झाल्याचे समोर आले आहे.

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य सचिन पायलट आता पत्नी सारा पायलटपासून वेगळे झाले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट यांच्यात घटस्फोट झाला आहे. पायलट यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. टोंक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या नावापुढे 'घटस्फोटित' असे लिहिले आहे. सचिन पायलट आणि सारा यांच्यात घटस्फोट झाल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.

सचिन आणि सारा यांना दोन मुले आहेत व ही मुले सचिन यांच्याकडे असल्याचाही खुलासाही प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. माहितीनुसार, सचिन पायलट आणि सारा यांचे सुमारे 19 वर्षांपूर्वी 15 जानेवारी 2004 रोजी लग्न झाले होते. सारा ही जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे. असे म्हटले जाते की अब्दुल्ला या लग्नाच्या विरोधात होते, तर पायलटचे कुटुंबही या नात्यावर नाराज होते. (हेही वाचा: Delhi Liquor Scam: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस, 2 नोव्हेंबरला होणार चौकशी)

या नात्यासाठी घरच्यांना समजावण्यात सचिन यशस्वी ठरले मात्र, सारा तसे करू शकली नाही. त्यामुळे फारुख अब्दुल्ला या लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. साराचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. या दोघांचे लग्न तत्कालीन दौसाच्या खासदार आणि सचिनची आई रमा पायलट यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाले होते. सचिन आणि सारा यांच्यात घटस्फोटाच्या छुप्या बातम्या अनेकवेळा समोर आल्याचे बोलले जात आहे, मात्र त्याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही. दोघांमध्ये घटस्फोट कधी झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. 2018 च्या निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नी आणि दोन मुलांचा उल्लेख केला होता.