Russia-Ukraine War: येत्या तीन दिवसांत भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 26 उड्डाणे निश्चित; 12,000 भारतीयांनी युक्रेन सोडले- Foreign Secretary 
Foreign Secretary (Photo Credit : ANI)

 

युक्रेन (Ukraine) संकटावर पत्रकार परिषद घेत असताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी अधिकारी पाठवण्यात आले आहेत. कीवमधून सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. कीवमध्ये सध्या एकही भारतीय नाही. 25 अधिकारी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई दलाचे सी-17 विमान बुधवारी पहाटे 4 वाजता रोमानियाला जाऊ शकते. येत्या तीन दिवसांत भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 26 उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. बुखारेस्ट आणि बुडापेस्ट व्यतिरिक्त, पोलंड आणि स्लोव्हाक रिपब्लिकमधील विमानतळांचा वापर निर्वासन उड्डाणे ऑपरेट करण्यासाठी केला जाईल. पंतप्रधान मोदींना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा फोन आला होता.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, जेव्हा आम्ही आमची पहिली अॅडव्हायझरी जारी केली होती, त्यावेळी युक्रेनमध्ये अंदाजे 20,000 भारतीय विद्यार्थी होते. त्यानंतर सुमारे 12,000 लोकांनी युक्रेन सोडले आहे, जे युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या एकूण संख्येच्या 60% आहे. उर्वरित 40% पैकी, सुमारे निम्मे लोक खार्किव, सुमी प्रदेशातील संघर्ष झोनमध्ये राहत आहेत आणि उर्वरित अर्धे एकतर युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा ते युक्रेनच्या पश्चिम भागात जात आहेत. ते सामान्यतः संघर्ष क्षेत्राबाहेर आहेत.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया संकटावर एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केले. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांचे दुपारी रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी स्वतंत्र कॉल झाले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी खार्किव आणि संघर्षग्रस्त भागातील इतर शहरांमध्ये अजूनही असलेल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी, तात्काळ सुरक्षित प्रवास करण्याच्या आमच्या मागणीचा जोरदार पुनरुच्चार केला. (हेही वाचा: Holi Special Superfast Trains: खास होळीनिमित्त पश्चिम रेल्वे चालवणार स्पेशल सुपरफास्ट गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक)

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी युक्रेनला भारताकडून पाठवण्यात आलेल्या मदतीबद्दल सांगितले. या मदतीमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर मदत साहित्य होते. उद्या दुसरी फ्लाइट पोलंडमार्गे दुसरी खेप जाईल. औषधांव्यतिरिक्त यामध्ये तंबू, ब्लँकेट, सर्जिकल ग्लोव्हज, पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या, स्लीपिंग मॅट्स, ताडपत्री अशा गोष्टी आहेत.