Roshni Nadar: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला 'रोशनी नादर' बनल्या HCL Technologies च्या चेअरपर्सन; 28 व्या वर्षी झाल्या होत्या CEO
Roshni Nadar Malhotra (Photo Credits: Shiv Nagar Foundation)

भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नादर मल्होत्रा (Roshni Nadar) ​​आता एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या (HCL Technologies) अध्यक्ष (Chairperson) झाल्या आहेत. आयटी दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीजने शुक्रवारी जाहीर केले की, अध्यक्ष शिव नादर यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने सांगितले की, एचसीएल टेक्नॉलॉजीजने कार्यकारी संचालक रोशनी नादर-मल्होत्रा यांना कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केली आहे आणि आता त्या शिव यांची जागा घेतील. 38 वर्षीय रोशनी नादर या प्रशिक्षित शास्त्रीय संगीतकार आहेत. 2010 मध्ये त्यांनी शिखर मल्होत्राशी लग्न केले जे एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष आहेत.

रोशनी नादर यांनी एचसीएल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पहिले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्या कंपनीच्या सीईओ नाबल्या होत्या. यासह, त्या एचसीएल टेक्नॉलॉजीज बोर्डच्या उपाध्यक्ष आणि शिव नादर फाऊंडेशनच्या विश्वस्त देखील आहेत. रोशनी या दिल्लीत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतील केलॉग (Kellogg) स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग इकॉनॉमिक लीडरस् इनिशिएटिव्हमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.

पदवी घेतल्यानंतर रोशनीने स्काई न्यूजच्या लंडन कार्यालयात काम केले. यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी ही नोकरी सोडली. ऑक्टोबर 2008 मध्ये रोशनी भारतात परतल्या आणि शिव यांच्या एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाल्या. (हेही वाचा: विजय मल्ल्या बँकांशी सेटलमेंट करण्यास तयार; दाखवली 13,960 कोटी रुपये देण्याची तयारी)

फोर्ब्सने 2017 ते 2019 पर्यंत जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्येही, रोशनी नादर यांचे नाव समाविष्ट झाले आहे. 2019 मध्ये त्या या यादीत 54 व्या स्थानावर होत्या. सन 2019 मध्ये त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या. आयआयएफएल वेल्थ हरुन इंडियाच्या (IIFL Wealth Hurun India) म्हणण्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 31,400 कोटी रुपये आहे.