
तेलंगणा काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असूनही, रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्या खंबीर नेतृत्वशैलीने पक्षाला दक्षिणेकडील राज्यात यश मिळवून दिल्याचे दिसून येते. कामारेड्डी यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांच्या BRS विरोधात जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. रवंत रेड्डी यांच्या रुपात काँग्रेसच्या हाताने केसीआर यांची मोटार थांबवल्याचेच चित्र तेलंगणामध्ये पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक 2023 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (3 डिसेंबर) सकाळी आठ वाजलेपासून सुरु आहे. आतापर्यंत थेट निकाल हाती आला नसला तरी प्राथमिक कल बरेच काही दर्शवून जात आहेत. तेलंगणातील कल सध्या तरी काँग्रेसच्या बाजूने आहेत. ज्यामध्ये 54 वर्षीय रेवंत रेड्डी यांची जादू आणि त्यांचा राहुल गांधी यांच्याशी असलेला समन्वय पाहायला मिळत आहे.
रेवंत रेड्डी हे खरे तर एन चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगु देसम पक्षाचे माजी आमदार. सन 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तव्हापासून त्यांनी विधानसभेवर दोन वेळा आमदार म्हणून निवडून जात एक भक्कम नेता म्हणून आपले स्थान पक्षात पक्के केले. (हेही वाचा, Telangana Assembly Election Results 2023: तेलंगणात सुरक्षा वाढ, आमदारांना हलवण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमध्ये बसेसची व्यवस्था (Watch Video))
काँग्रेस नेतृत्वाकडून धोरणात्मक पाठबळ:
रेवंत रेड्डी यांना काँग्रेस मध्ये पक्षांतर्गत विरोध जोरदार झाला. मात्र, कर्नाटक राज्यातील रणनितीपासून धडा घेत काँग्रेस नेतृत्व आणि हायकमांडने रेड्डी यांच्या नेतृत्वाला धोरणात्मक पाठिंबा दर्शवला. ज्यामुळे पक्षातील प्रतिस्पर्ध्यांचा विरोध असूनही, रेड्डी यांना एक प्रमुख व्यक्ती म्हणून प्रक्षेपित केले गेले. त्यांनी मोठ्या रॅलींना संबोधित केले आणि पक्षाच्या राष्ट्रीय चेहऱ्यांशी आपली नाळ घट्ट केली. ज्याचा जनमानसावर परिणाम झाला. जो निवडणूक निकालादरम्यान प्राथमिक कलाच्या रुपात पाहायला मिळत आहे.
वर्तमान निवडणूक सध्यास्थिती:
रेवंत रेड्डी सध्या तेलंगणाच्या स्थापनेपासून पारंपारिक बीआरएसचा बालेकिल्ला असलेल्या कामरेड्डीमध्ये आघाडीवर आहेत. शिवाय, त्यांनी लढलेली दुसरी जागा कोडंगल येथेही आघाडीवर आहे. दरम्यान, केसीआर यांनी गजवेल, त्यांचा बालेकिल्ला आणि त्यांनी लढवलेल्या दुसऱ्या जागेवर आघाडी कायम ठेवली आहे.
आत्मविश्वासपूर्ण अंदाज:
महत्त्वपूर्ण विजयाची अपेक्षा करताना, रेड्डी यांनी यापूर्वी तेलंगणात काँग्रेसला 80 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेवर चर्चा करताना, त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भर देताना सांगितले की, "एक स्क्रीनिंग कमिटी असते, एक निवड समिती असते आणि त्यानंतर CWC ला (मुख्यमंत्रीपदासाठी) बोलावे लागते. काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया असते. प्रत्येक गोष्टीसाठी. पीसीसी अध्यक्ष या नात्याने मला हायकमांडच्या प्रत्येक आदेशाचे पालन करावे लागेल."